Sunday, August 17, 2025 05:16:32 PM

New Delhi Railway Station : चेंगराचेंगरीनंतर कडेकोट बंदोबस्त, लक्ष वेधून घेतेय लेकराला उराशी धरून कर्तव्य बजावणारी आई

आरपीएफ इंडियाच्या अधिकृत एक्स हँडलने कॉन्स्टेबल रीनाचा व्हिडिओ शेअर केला आहे, आपल्या मुलाला घेऊन कर्तव्य बजावल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे.

new delhi railway station  चेंगराचेंगरीनंतर कडेकोट बंदोबस्त लक्ष वेधून घेतेय लेकराला उराशी धरून कर्तव्य बजावणारी आई

नवी दिल्ली : रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीनंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने सोमवारी दिली. चेंगराचेंगरीमध्ये किमान 18 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर रेल्वेच्या ढिसाळ व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्यानंतर रेल्वेने कठोर उपाययोजना केल्या आहेत. नवी दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या असून त्यावर देखरेख ठेवली जाईल आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी फलाटांवरील लोकांची संख्याही तपासली जाईल, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, पादचारी पुलावर अनेकजण कोणत्याही कारणाशिवाय उभे असतात किंवा रेल्वेची प्रतीक्षा करत असतात. त्यामुळे इतर प्रवाशांना दुसऱ्या फलाटांवर पोहोचण्यात अडथळे येतात. आता आम्ही कोणालाही वैध कारण असल्याशिवाय तिथे उभे राहण्यास मनाई केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. चेंगराचेंगरीनंतर रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) एका महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या भयानक परिस्थितीत एक आरपीएफ अधिकारी आपल्या लेकराची काळजी घेत आपले कर्तव्य बजावले. हे स्त्री शक्तीचे एक अद्भुत उदाहरण आहे, जी जिला कर्तव्य कसे पार पाडावे हे माहीत आहे.

हेही वाचा - Smartphone Export : भारतातून 1.55 लाख कोटींच्या स्मार्टफोन्सची निर्यात; 10 महिन्यांच्या आत 140 टक्क्यांनी वाढ

आरपीएफ इंडियाच्या अधिकृत हँडलने कॉन्स्टेबल रीनाचा व्हिडिओ शेअर केला आहे, आपल्या मुलाला घेऊन कर्तव्य बजावल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबल रीना तिच्या गणवेशात दिसत आहे. छातीशी बांधलेल्या बेबी कॅरियर बॅगमध्ये आपल्या बाळासह रेल्वे प्लॅटफॉर्मची तपासणी करताना दिसत आहे. RPF इंडियाने तिचे कौतुक करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “ती सेवा करते, ती संगोपन करते, ती सर्व काही करते – एक आई, एक योद्धा, परिस्थिती काहीही असली ती धैर्याने सामना करत आहे. 16BN/RPSF मधील कॉन्स्टेबल रीना तिच्या मुलाला घेऊन जाताना तिचे कर्तव्य बजावत आहे, दररोज कर्तव्याची जबाबदारी आणि मातृत्व दोन्हीमध्ये संतुलन साधणार्‍या असंख्य मातांचे ती प्रतिनिधित्व करते आहे.”

काही सोशल मीडिया युजर्सनी तिच्या धाडसाबद्दल कौतुक केले, तर काहींनी तिच्या मुलाचा जीव धोक्यात घालल्याबद्दल टीका केली. 'दिल्ली आणि पाटणा येथे आपण जे पाहिले त्यानंतर, ती तिच्या मुलाला धोक्यात का घालत असेल? तर आणखी एकाने 'तुम्हाला नारीशक्ती म्हणायला लाज वाटली पाहिजे. बाळाला जन्म देताना नारीशक्ती आधीच दिसून आली आहे. ती जे करत आहे, तो तिच्यावर अन्याय आहे आणि त्याच वेळी बाळाला धोक्यात घातले गेले आहे,' म्हटले आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. आता येथे वैध कारणाशिवाय कोणालाही पादचारी पुलावर रेंगाळण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाबरोबरच दिल्ली पोलीस आणि सरकारी रेल्वे पोलिसांनी स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त पोलीस तैनात केले आहेत. शनिवारच्या चेंगराचेंगरीनंतरही रविवारी स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. हजारो प्रवाशांना रेल्वेगाडीत चढणे अवघड झाले होते. त्यानंतर सोमवारपासून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

बिहारमध्ये रेल्वे स्टेशनवर गर्दी कायम
पाटणा रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी गच्च भरलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवासी जीवाचे रान करत असल्याचे दृश्य गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. महाकुंभासाठी प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची गर्दी कायम आहे. दिल्लीतील चेंगराचेंगरीची घटना विचारात घेऊन तिथेही खबरदारी म्हणून उपाययोजना लागू केल्या आहेत. तिकीट नसलेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जात नसल्याचे ‘ईसीआर’च्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - चक्क 400 कबुतरांची चोरी! इतकी होती किंमत.. पाळलेल्या 'या' कबुतरांमध्ये असे काय खास होते?

विनातिकीट प्रवास करायला मोदींनीच परवानगी दिलीय
बिहारमधून महाकुंभासाठी जाणारे अनेक प्रवासी विनातिकीट जात आहेत. बक्सर रेल्वे स्थानकावर तिकीट न काढताच प्रयागराजला जाणाऱ्या काही ग्रामीण महिलांना तेथील वरिष्ठ अधिकाऱ्याने अडवले असता, 'आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच विनातिकिट प्रवास करायची परवानगी दिली आहे,' असे या महिलांनी थेट सांगितले. त्यामुळे हे अधिकारी चकितच झाले. दानापूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जयंत कुमार आणि महिला यात्रेकरूंच्या संवादाचा व्हिडिओही समाज माध्यमांवर आला आहे.


सम्बन्धित सामग्री