Rahul Gandhi Press Conference Gyanesh Kumar Resignation: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आणि कथित व्होट चोरीच्या मुद्द्यावरून राजधानी दिल्लीत गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नागरिकांचे आणि विविध संघटनांचे उग्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा धसका घेत प्रशासनाने संपूर्ण दिल्ली शहराला छावणीचे स्वरूप दिले असून 20 ते 30 हजार पोलीस तसेच निमलष्करी दले तैनात केली आहेत. दिल्लीला अशा प्रकारे जेल बनवणे आणि रस्ते, बसेस व ट्रेन्स रोखणे हीच मोदी सरकारची सर्वात मोठी चूक आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ‘सरकारने असा कडक बंदोबस्त ठेवावा हीच आमची इच्छा होती, कारण यामुळे सरकारचे वास्तव देशासमोर येत आहे,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या विधानांमुळे वेगवेगळ्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
‘ज्ञानेश कुमारांना जितके प्रोटेक्ट कराल, तितके आम्ही कंट्रोलरकडे पोहोचू’; राहुल गांधींचा दावा
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारे विधान केले. ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोक ज्ञानेश कुमार यांना पूर्णपणे अभय देत आहेत. आम्ही त्यांचा राजीनामा मागत असलो, तरी सरकारने त्यांना अजिबात हटवू नये आणि जास्तीत जास्त संरक्षण द्यावे, असेच आम्हाला वाटते. सरकार ज्ञानेश कुमारांना जेवढे जास्त जपेल आणि वाचवेल, तितकेच आम्ही त्यांच्या मुख्य ‘कंट्रोलर’च्या (नियंत्रकाच्या) अधिक जवळ पोहोचू. सरकारची हीच चूक आमच्यासाठी फायदेशीर ठरत आहे.’
‘ज्ञानेश कुमारांची झोप.. 50 टक्के पोलीस आमच्या बाजूने’; राहुल गांधींचा मोठा दावा
मुख्य निवडणूक आयुक्तांवर थेट निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, ‘आम्हाला सगळीकडून माहिती मिळत असून ज्ञानेश कुमार यांची काय अवस्था झाली आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्यांची रात्रीची झोप पूर्णपणे उडाली आहे. घाबरू नका, परंतु आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या पाठीमागे जे मुख्य सूत्रधार बसले आहेत, त्यांना हटवण्यासाठीच हे लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच, ड्युटीवर तैनात असलेल्या 50 टक्के पोलिसांचे मन विचलित झाले असून ‘आम्हाला तरुणांवर का लाठीचार्ज करायला सांगता?’ असा प्रश्न ते स्वतःच्या वरिष्ठांना विचारत असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला.
‘भाजप गुंडांना मोकळे रान देतेय, 200 केंद्रीय अधिकारी आमच्या थेट संपर्कात’
पोलीस, सीआरपीएफ (CRPF) आणि आयटीबीपी (ITBP) मधील कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) लोक आणि गुन्हेगारांना मोकळे रान देऊन तरुणांवर व महिलांवर पोलिसांकरवी कारवाई करायला लावली जात आहे,’ असे ते म्हणाले. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी भेट नाकारल्यामुळे आज न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, केंद्र सरकारमधील तब्बल 200 वरिष्ठ अधिकारी आपल्या थेट संपर्कात असून आतली सर्व माहिती पुरवत असल्याचा मोठा दावाही त्यांनी शेवटी केला.
दिल्लीतील आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता; राजकीय वर्तुळात खळबळ
राहुल गांधी यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि खळबळजनक विधानांमुळे केंद्र सरकार व भाजपवर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला आहे. दिल्लीतील छावणीसदृश वातावरण आणि विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने येत्या काही तासांत या आंदोलनाला आणि न्यायालयीन लढाईला अत्यंत महत्त्वाचे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – CJP च्या आरोपांचे दिल्ली पोलिसांकडून खंडन; भरपत्रकार परिषदेत दाखवला दीपकेंचा पोलीस ठाण्यातील ‘तो’ व्हिडीओ