Saturday, May 10, 2025 11:31:49 AM

बेस्ट बसेसचा 'रिअल-टाईम' आता गुगल मॅपवर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबईकरांसाठी प्रवास अधिक सुकर, अधिक स्मार्ट आणि वेळबचत करणारा ठरणार आहे.

 बेस्ट बसेसचा रिअल-टाईम आता गुगल मॅपवर जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई: मुंबईकरांसाठी प्रवास अधिक सुकर, अधिक स्मार्ट आणि वेळबचत करणारा ठरणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाने आता गुगलसोबत भागीदारी करत मुंबईतील बेस्ट बसेसची 'रिअल-टाईम' माहिती’ (Real-time tracking) गुगल मॅपवर उपलब्ध करून दिली आहे. यामुळे नागरिकांना बसची अचूक वेळ, स्थान, विलंब याविषयी मोबाईलवरूनच माहिती मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नव्या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

 'गुगल मॅपवरील ही सेवा म्हणजे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीतील एक क्रांतिकारी टप्पा आहे. नागरिकांना कुठली बस कधी येईल, तिचा मार्ग काय असेल, विलंब झाला आहे का, ही माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होईल आणि बेस्टच्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.  असे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत म्हणाले की, ही योजना नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला अधिक सुलभ करेल.

गुगल मॅप्सच्या भारतातील प्रमुख रोली अग्रवाल यांनी सांगितले की, सार्वजनिक वाहतुकीच्या अचूक माहितीचा प्रसार करणे हे गुगल मॅप्सचे मुख्य ध्येय आहे, आणि बेस्टसोबतची ही भागीदारी त्याच दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.


बेस्ट बसचं रिअल-टाइम स्थान कसं पाहाल? 

1. आपल्या मोबाईलवर Google Maps अ‍ॅप उघडा.
2. इच्छित प्रवासाचं ठिकाण टाका आणि ‘Go’ बटणावर क्लिक करा.
3. ‘ट्राम’सदृश चिन्हावर क्लिक करून ‘Public Transport’ मोड निवडा.
4. सुचवलेल्या मार्गांमधून बेस्ट बस निवडा आणि प्रत्येक स्टॉपसह रिअल-टाइम माहिती पहा.
5. एखाद्या बस स्टॉपचं नाव सर्च केल्यास, तिथून जाणाऱ्या बसचीही थेट माहिती उपलब्ध होईल.

गुगल मॅपवर हिरवा रंग वेळेत येणाऱ्या, तर लाल रंग विलंब झालेल्या बस दाखवेल. ही सेवा सध्या मुंबई शहरासाठी लागू आहे.


सम्बन्धित सामग्री