मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सहकुटुंब मतदान केले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मतदारांना मतदान करा असे आवाहन केले. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दुपारी एक वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. गडचिरोलीत सर्वाधिक आणि मुंबई शहर जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्कमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे आणि शिंदे कुटुंबातील इतर सदस्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदान केलं. राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आणि लाडक्या बंधुंना माझी विनंती आहे की, मतदान करा असं आवाहन फडणवीसांनी केलं. लोकशाहीत जो मतदान करतो त्याला सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा जास्त अधिकार असतो असंही फडणवीस म्हणाले. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात महिलांच्या मतदानाचा टक्का कमी असतो, तो वाढेल अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांनी भल्या सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना निर्णय घ्यायचा की, पुढच्या पाच वर्षांसाठी महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा आहे. योग्य उमेदवारांना मतं देऊन सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावावा, असे म्हणत अजित पवार यांनी मतदानाला जाताना प्रतिक्रिया दिली. तर महाराष्ट्राची घोडदौड कायम राहिल अशा पद्धतीने मतदान करा, असं म्हणत अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला योग्य मतदान करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील चित्र यंदा सकारात्मक असेल. बारामती ठरवतील की आता किती लीड द्यायचंय, असे म्हणत अजित पवारांनी विश्वास व्यक्त केला.