डोंबिवली: अनेक तरुणांना मोठी नोकरी करण्याची इच्छा असते. अनेकवेळा तरुणांना नोकरीच्या आमिषाने गंडा देखील घातला जातो. असाच काहीसा प्रकार डोंबिवलीतुन समोर आला आहे. रेल्वेविभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने डोंबिवलीमध्ये बेरोजगार तरुणांना गंडा घालण्यात आला आहे. तरूणांची तब्बल 74 लाख 40 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आल्याने तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेकडील चिकणघर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील चार सदस्यांसह 3 कथित रेल्वे अधिकारी आणि एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचा मुलगा बेरोजगार असल्याने त्याला नोकरीची गरज होती. तक्रारदाराची ओळख गुन्हा दाखल झालेल्यांबरोबर झाली. या नऊ व्यक्तींमधील काही जण रेल्वेचे अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी असल्याचे तक्रारदाराला भासविण्यात आले.
रेल्वेत आमची ओळख असून विविध पदांवर आम्ही नोकरी मिळवून देऊ शकतो, असे अमिष तक्रारदाराला दाखवण्यात आले. या अमिषाला भुलून तक्रारदाराने आपल्या मुलासह इतर बेरोजगार तरूणांनी रेल्वेत नोकरी मिळेल या आशेने गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. संबधिताच्या कुटुंबीयांतील एका सदस्याने कथित रेल्वे अधिकाऱ्यांची तक्रारदाराशी भेट घालून दिली. तक्रारदार आणि इतर बेरोजगार तरूणांकडून नोकरी लावण्याच्या बदल्यात 74 लाख 40 हजार रूपये विविध बँक खात्यांवर जमा करून घेतले. त्यांना बनावट ई-मेलद्वारे नियुक्तीची पत्रे कथित रेल्वे अधिकाऱ्यांनी पाठविली.
हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणानांची आणि त्यांच्या कुटूंबियांची पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी तक्रारीसाठी धाव घेतली. दरम्यान आता या संपूर्ण प्रकारामुळे तरुणांना कोणावरही विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.