Chanakya Niti in Marathi : हल्ली बायको किंवा प्रेयसीला खूश करण्यासाठी गिफ्ट देण्याचं प्रमाण वाढलं आहे. याने त्या खूश होतात.. पण तात्पुरत्या काळासाठी. याशिवाय, मुलींवर आपली छाप सोडण्यासाठी सिंगल असलेली मुलं काय काय करत नाहीत..! पण तुम्हाला माहिती आहे का, की महिला नेमक्या कशाने खूश होतात? कशामुळे त्या आयुष्यभरासाठी एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करू लागतात?
मुलींचं किंवा बायकांचं मन ओळखणं कधी कुठल्या पुरुषाला जमलंय का? त्यामुळेच 'तिला' खूश, आनंदी, समाधानी कसं ठेवायचं हा पतीसमोर असलेला सर्वात मोठा प्रश्न. पण आचार्य चाणक्यांनी सर्व पुरुषांसाठी हे काम सोप्पं करून दिलंय.. प्रसंगानुरूप गिफ्ट देण्यापेक्षाही अधिक मौल्यवान गोष्टी चाणक्यांनी सांगितल्या आहेत. पुरुषाची कोणते गुण आणि कोणत्या क्षमता कोणत्याही चांगल्या मनाच्या, सुस्वभावी आणि शालीन स्त्रीला संतुष्ट करतात, हे चाणक्य यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - Chanakya Niti : 'हे' लोक सापापेक्षा हजार पटींनी वाईट, आयुष्यात दुर्दैवच घेऊन येतात..! तुमच्याही सहवासात असे कोणी आहे का?
जबाबदार असणं किंवा आपली जबाबदारी ओळखून ती स्वीकारणं - चाणक्य नीतीमध्ये असं म्हटले आहे की, पुरुषांनी नेहमी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. पुन्हा पुन्हा सांगावे न लागता आपली जबाबदारी ओळखून ती पार पाडणारे पुरुष त्यांच्या पत्नीला प्रिय असतात. पत्नीला शारीरिक आणि मानसिकरित्या समाधानी ठेवण्याचीही त्यांची जबाबदारी असते. ही बाब त्यांनी स्वतःच ओळखली पाहिजे.
सावधगिरी - पतीने सदैव सतर्क राहावं. सावधगिरी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आवश्यक असते. घरातील समस्या, साध्या चर्चा, शत्रू-मित्रांविषयीची जाणीव, करिअरबाबत गांभीर्य आणि त्यातील बदलत्या संधी, गुंतवणूक अशा अनेक बाबींमध्ये सावधगिरीची गरज असते. स्वतःहून विचारपूस करणारे पुरुष महिलांना आवडतात.
निष्ठा - पुरुषांनी त्यांच्या प्रेयसी किंवा पत्नीशी एकनिष्ठ असले पाहिजे. ही गोष्ट त्यांना अत्यंत प्रिय असते. जे पुरुष कोणत्याही स्त्रीला वाईट नजरेने पाहत नाहीत किंवा जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाची हाव मनात धरत नाहीत, असे पुरुष महिलांना आवडतात. अशा एकनिष्ठ पतीवर तशीच एकनिष्ठ पत्नी खूप प्रेम करते.
शौर्य - महिलांना वीर पुरुष खूप आवडतात. त्यामुळे पुरुषांनी कोणत्याही परिस्थितीत आपली पत्नी, मुलं आणि कुटुंबाची रक्षा करावी. वीर पुरुषाच्या पत्नीला नेहमी आपल्या पतीचा अभिमान वाटतो.
प्रामाणिकपणा - कोणत्याही चांगल्या स्त्रीला प्रामाणिकपणा हा पुरुषामधील गुण प्रिय असतो. जोडीदाराने नात्यामध्ये प्रामाणिक असण्याबरोबरच आपला नोकरी-व्यवसाय प्रामाणिकपणे आणि सचोटीने करून त्यात यश मिळवल्यास त्याचा त्याच्या प्रेयसी किंवा पत्नीला अभिमान असतो. अशा पुरुषांना महिलांकडून आपोआप आदर मिळतो. अशा पुरुषांकडे महिला आकर्षित होतात.
मनमिळाऊ आणि इतरांनाही योग्य आदर देणारा - मनमिळाऊ आणि जोडीदाराच्या माता-पित्यांनाही योग्य आदर देणारा पुरुष सर्व महिलांना प्रिय असतो. माणुसकीने वागणाऱ्या शांत, सरळ आणि सौम्य स्वभावाच्या पुरुषावर महिलांचा जीव लवकर जडतो. महिला रूपापेक्षा व्यक्तिमत्वाला महत्त्व देतात. पुरुषांचं रूप नाही तर मन पाहून त्या आकर्षित होतात.
हेही वाचा - चाणक्य नीती : नका जाऊ या ठिकाणी मुळीच.. अन्यथा, तुमच्या प्रतिष्ठेला बसेल धक्का; स्वाभिमान होईल चक्काचूर!
आपलं म्हणणं समोरच्याने ऐकावं असं कुणाला वाटणार नाही? महिलांनाही असाच जोडीदार हवा असतो जो त्यांचं बोलणं ऐकून घेईल. त्यांच्याशी चर्चा करेल. त्यांना जोडीदार म्हणून समानतेचा दर्जा देईल. दुर्लक्ष करणारे जोडीदार महिलांना फारसे आवडत नाहीत.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)