Sunday, August 17, 2025 05:12:50 PM

धारुर हादरलं: कामधेनू गोशाळेत 29 गायींचा अचानक मृत्यू, विषबाधेचा संशय

प्रसिद्ध प्रगत शेतकरी ठाकुर उदयसिंह दिख्खत यांच्या या गोशाळेत दहा दिवसांपूर्वी अचानक 29 गिर जातीच्या गायी मृत्यूमुखी पडल्या

धारुर हादरलं कामधेनू गोशाळेत 29 गायींचा अचानक मृत्यू विषबाधेचा संशय

धारुर (बीड):  किल्लेधारूर येथील कामधेनू गोपीनाथ मुंडे गोशाळा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी एका दुःखद घटनेमुळे. प्रसिद्ध प्रगत शेतकरी ठाकुर उदयसिंह दिख्खत यांच्या या गोशाळेत दहा दिवसांपूर्वी अचानक 29 गिर जातीच्या गायी मृत्यूमुखी पडल्या, त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. गायींच्या मृत्यूचं कारण प्रथमदर्शनी समजले नाही, मात्र आता परभणीहून आणलेल्या तुरीच्या भुस्कटामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

उदयसिंह ठाकुर यांची ही गोशाळा तांदुळवाडी शिवारात गेली आठ वर्षे यशस्वीपणे चालू आहे. त्याठिकाणी देशी, गावरान, गिर, कंधार-देवणी अशा विविध जातींच्या सुमारे 125 गायींचं संगोपन केलं जातं. ही गोशाळा केवळ व्यवसाय नसून पुण्यकर्म मानून चालवली जाते. विशेष म्हणजे शासकीय अनुदानाचा एक रुपयाही त्यांनी कधी स्वीकारलेला नाही. अद्ययावत शेड, चारा-पाण्याची सोय आणि स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष देणारी ही गोशाळा पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येत असतात.

घटनेच्या काही दिवस आधीच, चाऱ्यासाठी परभणी येथून तुरीचे भुस्कट खरेदी करून आणण्यात आले होते. त्यानंतर सलग काही दिवसांत एकाच दिवसात 6 अशा प्रमाणात एकूण 29 गायींचा मृत्यू झाल्याचे ठाकुर यांनी सांगितले.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत मृत गायींचं पोस्टमार्टम केलं, परंतु तात्काळ काही निष्पन्न झालं नाही. मात्र, वैद्यकीय अहवालानंतर हे स्पष्ट झालं की तुरीवर फवारण्यात आलेल्या रसायनांमुळे गायींना विषबाधा झाली आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. 

या घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. विजय कराड यांनी तात्काळ लक्ष घालून विशेष पथक गोशाळेकडे पाठवलं. त्यांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे आणखी गायींचा जीव वाचवण्यात यश मिळालं, अशी चर्चा गावात सुरू आहे. मृत गायींच्या अंत्यविधीसाठी धार्मिक विधीनुसार शेतातच दफनविधी करण्यात आले. एकीकडे या घटनेने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. 


सम्बन्धित सामग्री