मुंबई: मुंबईत एका सेलिब्रिटीच्या हत्येचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिष्णोई गँगशी संबंधित पाच शार्पशूटर मुंबईत दाखल झाले होते. त्यांच्याकडून 7 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींचे वय 22 ते 27 दरम्यान असून, ते संपूर्ण तयारीनिशी हत्येच्या उद्देशाने आले होते.
गुन्हे शाखेच्या कारवाईत विकाश ठाकूर उर्फ विक्की, सुमितकुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेककुमार गुप्ता या पाच जणांना अंधेरीतून अटक करण्यात आली. विशेष म्हणजे सुमितकुमारवर यापूर्वीही गोळीबार आणि खुनाच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर विकाश ठाकूर याच्यावरही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या आरोपींचे बिष्णोई गँगशी कनेक्शन असल्याची शक्यता असून ते हरियाणा, बिहार आणि राजस्थान येथून आले होते. मात्र, त्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या सेलिब्रिटीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.