New India Cooperative Bank
Edited Image
New India Cooperative Bank Case: मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. बँकेच्या माजी महाव्यवस्थापकांनी शाखेच्या तिजोरीवर डल्ला टाकल्याची घटना समोर आली आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी महाव्यवस्थापकांनी बँकेच्या तिजोरीतून 122 कोटी रुपये काढले आहेत. आरोपी माजी महाव्यवस्थापकाचे नाव हितेश प्रवीणचंद मेहता असं आहे. हितेश बँकेचे महाव्यवस्थापक असताना ते दादर आणि गोरेगाव शाखांची जबाबदारी सांभाळत होते.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा -
हितेशने आपल्या पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांच्या खात्यांमधून 122 कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बँकेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता हितेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - सेक्सटॉर्शनमुळे अलिबागमधील शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल! अटल सेतूवरून उडी मारून केली आत्महत्या
प्राप्त माहितीनुसार, हा घोटाळा 2020 ते 2025 या काळात झाला होता. या घोटाळ्यात हितेश आणि आणखी एक व्यक्ती सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुढील तपासासाठी हे प्रकरण ईओडब्ल्यूकडे वर्ग करण्यात आले आहे. दादर पोलिसांनी याप्रकरणी बीएनएसच्या कलम 316 (5) आणि 61(2) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
हेही वाचा - आरटीई अंतर्गत ३ लाख अर्जांमधून १ लाख विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईस्थित या बँकेच्या 1.3 लाख ठेवीदारांपैकी 90 टक्क्यांहून अधिक ठेवीदारांच्या खात्यात 5 लाख रुपयांपर्यंत ठेवी आहेत. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खात्यांचे ऑडिट करताना रिझर्व्ह बँकेला काही अनियमितता आढळून आल्या होत्या. यानंतर, बँकेचे मुख्य अनुपालन अधिकारी (CCO) यांनी गुरुवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यांनी हे प्रकरण बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी केलेल्या निधीच्या गैरवापराशी संबंधित असल्याचं सांगितलं.