छत्रपती संभाजीनगर: जगभरात वाघांची संख्या कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जात असताना, छत्रपती संभाजीनगर महापालिका मात्र स्थानिक प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या संख्येच्या वाढीबाबत काळजी करत असल्याची बाब समोर आली आहे. सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात वाघांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी त्यांच्या प्रजननावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे.
सध्या सिद्धार्थ उद्यानात वाघांसाठी उपलब्ध असलेली जागा अपुरी असल्याने नर आणि मादी वाघांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवले जात आहे. त्यामुळे त्यांच्या प्रजननाची प्रक्रिया थांबवली जाते. सकाळच्या वेळेत देखील नर आणि मादीला टप्प्याटप्याने मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात येते, मात्र त्यांना एकत्र सोडले जात नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे जागेची कमतरता असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: 'डिनो मोरियाचं तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल' - एकनाथ शिंदे
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाला स्थलांतरित करण्यासाठी मिटमिटा येथे नवीन झूलॉजिकल पार्क उभारण्यात येत आहे. या पार्कसाठी अंदाजे 145 कोटी रुपये खर्च करून काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, दहा वर्षांनंतरही या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. परिणामी, सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना नव्या जागी हलविण्याचा मुद्दा अद्याप रखडलेला आहे.
जगभर वाघांची संख्या कमी होत असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी विविध योजना राबविल्या जात असताना, छत्रपती संभाजीनगरच्या प्राणिसंग्रहालयात मात्र त्यांची संख्या वाढू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, जागेच्या मर्यादेमुळे हे पाऊल उचलावे लागत आहे.
या परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर वाघांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना स्थानिक पातळीवर वेगळी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. वाघांचे 'फॅमिली प्लॅनिंग' हा प्रकार लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.