Sunday, August 17, 2025 01:41:25 AM

Swachh Survekshan 2024: स्वच्छतेच्या यादीत महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय; नवी मुंबईला मानाचं स्थान

नवी मुंबईने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये महाराष्ट्रातील पहिलं स्थान पटकावत स्वच्छतेतील आपली ओळख सिद्ध केली. राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारून शहराने राज्याचा गौरव वाढवला.

swachh survekshan 2024 स्वच्छतेच्या यादीत महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय नवी मुंबईला मानाचं स्थान

Swachh Survekshan 2024: स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वीतेसाठी देशभर विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यात महाराष्ट्रातील नवी मुंबईने आपल्या स्वच्छतेच्या परंपरेला जागून पुन्हा एकदा मानाचा टिळा लावला आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष गटात नवी मुंबईने आपले स्थान पक्के केले आहे.

शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने यावर्षीपासून स्वच्छतेच्या गुणवत्तेच्या मापनामध्ये बदल करत ‘सुपर स्वच्छ लीग’ ही स्वतंत्र गटवारी सुरू केली आहे. या गटात अशा शहरांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांनी सलग तीन वर्षांत किमान दोन वेळा देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत अग्रक्रम गाठला आहे.

हेही वाचा: Cleanliness Award: स्वच्छतेत गोव्याची देशभर दखल, स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये पणजी आणि संखाळीचा राष्ट्रीय सन्मान

10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे, ज्याला ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये मानांकन मिळालं आहे. केवळ एवढंच नाही, तर कचरामुक्त शहर म्हणून ‘सेव्हन स्टार’ मानांकन आणि ओडीएफ कॅटेगरीतील सर्वोच्च ‘वॉटर प्लस’ मानांकनही नवी मुंबईने टिकवून ठेवले आहे.

या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीत आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात नवी मुंबई महापालिकेला गौरवण्यात आलं. या वेळी महाराष्ट्राच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी हा सन्मान स्वीकारला.

हेही वाचा:Maharashtra Government: उर्जा क्षेत्रात महाराष्ट्र-कॅलिफोर्निया विद्यापीठ सामंजस्य करार; संशोधन, नवकल्पना आणि धोरणांवर भर

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यशाचे श्रेय राज्य सरकारच्या नेतृत्वाला, स्थानिक लोकप्रतिनिधींना, ब्रँड अॅम्बेसेडर्सना, नागरिकांना व विशेषतः स्वच्छतामित्रांना दिले. 'ही फक्त नवी मुंबईची नव्हे तर महाराष्ट्राचीही शान आहे,' असे ते म्हणाले. नवी मुंबईच्या या यशामध्ये स्वच्छतामित्र, स्वयंसेवी संस्था, व्यापारी, विद्यार्थी व नागरिक यांचा मोठा वाटा आहे. स्वच्छतेच्या मोहिमेत सामूहिक सहभागातून मिळालेलं हे मानांकन हा संपूर्ण शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे. नवी मुंबईने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये मिळवलेला गौरव हा स्वच्छ भारत मोहिमेच्या दिशेने टाकलेलं आणखी एक मोठं पाऊल ठरलं आहे.


सम्बन्धित सामग्री