जालना: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटप करण्यात आले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
"भेटी लागी जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥"
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांना पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वतीने करण्यात आलेल्या रेनकोट वाटपामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या उपक्रमामुळे वारकऱ्यांना पावसातही सुखरूपपणे आपला प्रवास पूर्ण करता येणार आहे. मुख्यमंत्री वारकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात संवेदनशील आहेत हे यातून अधोरेखित होते.
हेही वाचा: श्री श्री रविशंकर यांच्यामुळे कोलंबियातील आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सवात साजरा
आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना 2.8 कोटींचे अनुदान मिळणार
आगामी आषाढी एकादशी वारी करिता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण 1400 दिंड्यांना प्रति दिंडी 20,000 रुपये या प्रमाणे 2 कोटी 80 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील 14 जून आणि 17 जून 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. वारी अनुदानासाठी निधी हा अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत वितरित करण्यात आलेला नसून सर्वसाधारण योजनेतील जाहिरात व प्रसिद्धी राखीव असलेल्या निधीतून उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी आरक्षित निधीवर कोणताही अन्याय झालेला नाही, असे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने स्पष्ट केले आहे.