सोलापूर: सोलापूर येथील नामांकित मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर यांच्या आत्महत्येला दहा दिवस होऊन गेले. मात्र, तरीही या प्रकरणातील गूढ कायम आहे. 18 एप्रिल रोजी रात्री डॉ. वळसंगकर यांनी स्वतःच्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांनी नेमकं कोणत्या कारणामुळे इतकी टोकाची भूमिका घेतली असावी, हे अद्याप अस्पष्ट आहे.
या प्रकरणात, डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने या महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. वळसंगकर यांनी लिहलेल्या चिठ्ठीत मनीषा या महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला अटक करून कसून चौकशी केली आहे. ती 9 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. मनीषा यांनी रुग्णालयाच्या कामकाजात अनियमितता आणल्याचे आणि डॉक्टरांवर अधिकार चालवल्याचे आरोपही समोर आले आहेत. या घटनेमागे अंतर्गत कौटुंबिक वाद देखील एक कारण असू शकतो, अशी चर्चा आहे. डॉ. वळसंगकर यांचा मुलगा आणि सून तिघे न्यूरोसर्जन आहेत आणि रुग्णालयाच्या कारभारात मतभेद होते. डॉक्टरांनी निर्माण केलेल्या या रुग्णालयात त्यांचे अधिकार कमी करण्यात आले होते. ओळखीच्या रुग्णाचे बिल कमी करण्याची विनंती देखील फेटाळण्यात आल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
आत्महत्येपूर्वी डॉक्टरांनी केले चार लोकांना कॉल:
डॉक्टरांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? याचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांच्या मोबाईलचा 'सीडीआर' काढला आहे. मोबाईलच्या सीडीआर नुसार 18 एप्रिलला डॉक्टरांना आलेले आणि त्यांनी केलेल्या कॉलची संख्या 27 पर्यंत आहे. गोळ्या झाडण्यापूर्वी रात्री 8 नंतर त्यांनी चार लोकांना कॉल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. ज्या डॉक्टरांनी हजारो रुग्णांच्या मेंदूवर उपचार केले, त्याच डॉक्टरांना मेंदूत गोळी झाडून आपला जीव देण्याची वेळ का आली? असा सवाल उपस्थित होत आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी वीस ते पंचवीस वर्षांत मेडिकल क्षेत्रात मोठं नाव केलं होतं. मागील 15 ते 20 वर्षांत त्यांनी म्युच्युअल फंडात सुमारे 160 कोटी रुपये गुंतवले असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. ही गुंतवणूक एसआयपी पद्धतीने केली आहे. एखाद्या व्यक्तीने मागील 15 ते 20 वर्षांत 160 कोटी रुपये गुंतवले असल्यास, शेअर बाजाराच्या अनुषंगाने तिच्या वारसाला आता किमान 300 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मिळणे शक्य असल्याचे गुंतवणूक तज्ज्ञांनी सांगितले. डॉ. वळसंगकरांनी ही गुंतवणूक करत असताना वारस म्हणून कोणाच्या नावाची नोंद केली आहे? याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही. डॉ. वळसंगकर यांचे मृत्युपत्र आणि वारस असलेली कागदपत्रे दाखल केल्यानंतर संबंधितांना ती रक्कम मिळू शकणार आहे. पण, डॉ. शिरीष वळसंगकरांनी नॉमिनी म्हणून कोणाच्या नावाची नोंदणी केली आहे, याबाबत उत्सुकता आहे.
हेही वाचा: कौटुंबिक भांडणातून बापाने केली मुलाची गळा आवळून हत्या
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येपूर्वीचा घटनाक्रम:
18 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता डॉ. वळसंगकर यांनी एस.पी ऑफ न्युरोसायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घराकडे रवाना झाले. रात्री 8:30 वाजता त्यांच्या बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. त्यानंतर जेव्हा दुसरा फायर झाला तेव्हा कुटुंबीयांनी त्यांच्या बेडरूमकडे धाव घेतली. जेव्हा ते त्यांच्या बेडरूममध्ये पोहोचले, तेव्हा डॉ. शिरीष वळसंगकर रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले. रात्री 9 वाजता कुटुंबीयांनी त्यांना त्यांच्या रुग्णालयात दाखल केले. रात्री 10:20 वाजता डॉ. वळसंगकर यांना मृत घोषित केले गेले. रात्री 10:30 वाजता पोलिस उपयुक्त विजय कबाडे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम सील केला. रात्री 10:45 वाजता फॉरेन्सिक टीम दाखल झाली आणि बेडरूममधील बंदूक व रक्ताचे नमुने घेतले.