पुणे: रविवारी सकाळी पुण्यात एक धक्कादायक अपघात घडला. वेद विहार परिसरात भरधाव वेगाने जाणारी रिक्षा अचानक रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर आदळली. या अपघातात रिक्षाचालक मात्र रिक्षात अडकल्याने शहरात एकच खळबळ उडाली. अपघातग्रस्त रिक्षा (क्रमांक MH 12 QR 4621) इतकी चिरडली गेली की रिक्षाचालक गणेश कोळसकर (वय: 35) यांना रिक्षातून बाहेर काढणे अशक्य झाले. तसेच, या घटनेची माहिती मिळाल्यावर, क्षणाचाही विलंब न करता वारजे फायर स्टेशन एनडीए अग्निशमन केंद्रातील रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
हेही वाचा: Suraj Chavan vs Chhava Protest : रमीपासून सुरुवात, मारहाण अन् राडा; छावाच्या आंदोलनानंतर सूरज चव्हाण बॅकफूटवर
यावेळी, अग्निशमन दलाच्या जवानांनी विशेष 'स्प्रेडर कटर' या उपकरणाच्या मदतीने रिक्षेचे भाग कापले. तसेच, गणेश कोळसकर यांची अत्यंत काळजीपूर्वक सुटका केली. या दरम्यान, त्यांचे दोन्ही पाय रिक्षामध्ये अडकले होते. जवानांनी ही कारवाई अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केली आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या नंतर, रुग्णवाहिकेतून त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. अपधातानंतर, रिक्षा रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. यामुळे, पोलिस आणि अग्निशमन दलाने रिक्षा बाजूला हलवून रस्ता मोकळा केला. या बचाव मोहिमेत अग्निशमन दलाचे अधिकारी सुनिल नामे यांच्या नेतृत्वाखाली विजय स्वामी, बाळू तळपे, आशिष सुतार, कोंडीबा झोरे, भंडारी, जांभळे, तसंच चालक गोडसे, कल शेट्टी आणि चौरे यांनी अपघातस्थळी मोठी मदत केली होती. या अपघातात रिक्षाचालकाचा जीव थोडक्यात वाचला असला तरी रिक्षाचालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबद्दल, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.