मुंबई: 31 मार्च 2025 रोजी पुण्यातील काही भागात हलका पाऊस झाला. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी आणि बुधवारी मुंबईमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाटी वादळे होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शहराचे वाढते तापमान. त्यामुळे, उष्णतेपासून लक्षणीय आराम मिळण्याची शक्यता कमी आहे.
एका वृत्तानुसार, आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी स्पष्ट केले की, 'मराठवाडा आणि आसपासच्या खालच्या ट्रॉपोस्फीअरमध्ये चक्राकार परिभ्रमण आहे'. नायर यांनी दिलेल्या हवामान पद्धतीवरून असे सूचित होते की मंबईमध्ये हलका पाऊस पडू शकतो. त्यासोबतच, ठाणे आणि जवळच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईसह ठाणे आणि रायगडसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी:
आयएमडीने ठाणे आणि रायगडसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात, नाशिकमध्ये गारपीट होऊ शकते. नायर यांनी स्पष्ट केले की, '1 मार्च ते 31 मे दरम्यान होणारा कोणताही पाऊस हा मान्सूनपूर्व कालावधीचा भाग मानला जातो'. सोमवारी, 31 मार्च 2025 रोजी सांताक्रूझ हवामान वेधशाळेने कमाल तापमान 33.2 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवले आहे, जे सामान्य तापमानापेक्षा 1.2 अंश सेल्सिअस जास्त आहे. दरम्यान, कुलाबा येथे कमाल तापमान 32.7 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा 1.2 अंश सेल्सिअस अधिक आहे.
छत्तीसगडपासून ते तामिळनाडूपर्यंत पसरलेला हवामान ट्रफ:
अपेक्षित पाऊस दक्षिण छत्तीसगडपासून उत्तर अंतर्गत तामिळनाडूपर्यंत पसरलेल्या हवामान ट्रफ रेषेशी संबंधित आहे. या ट्रफ रेषेमुळे, समुद्रसपाटीपासून 0.9 किमी उंचीवर ईशान्येकडील वारे वाहतात, ज्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागांवर परिणाम होतो.
आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर काय म्हणाल्या:
'मार्च आणि एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस पडणे ही गोष्ट मुंबईसाठी असामान्य नाही. वाऱ्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे अशा पूर्व-मान्सूनच्या सरी येणे सामान्य आहे', असे आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी:
पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे.