पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणातील पहिला अहवाल महिला आणि बालकल्याण समितीने सादर केला आहे. या अहवालात हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा बळी घेतल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला. तसेच तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करा अशी शिफारस महिला आणि बालकल्याण समितीने केली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला व बालकल्याण समितीने अहवाल सादर केला. हगवणे कुटुंबाचे निकटवर्तीय असलेल्या जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे. तसेच मयुरी हगवणे प्रकरणाची जर दखल घेतली असती तर वैष्णवीची आत्महत्या टाळता आली असती असे महिला व बालकल्याण समितीने म्हटले आहे. मयुरी हगवणेची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस समितीने केली आहे.
हेही वाचा: वैष्णवी हगवणे प्रकरणात दोषारोपपत्र दाखल; दोषारोपपत्रात एकूण 11 जण आरोपी
महिला व बालकल्याण समितीने अहवाल सादर केला. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ताशेरे ओढताना जालिंदर सुपेकर यांची चौकशी करुन या प्रकरणात त्यांना सहआरोपी करण्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालात तपशील समोर आला आहे. हगवणे कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेल्या जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीच्या बँक खात्यात रुखवताच्या नावाखाली तब्बल दीड लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा कसून चौकशी करुन त्यांना सुद्धा सहआरोपी करण्याचे समितीने अहवालात स्पष्ट नमूद केले आहे.
राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण बरेच चर्चेत होते. वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. नुकतच पोलिसांनी या प्रकरणातील दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात 11 जण आरोपी असल्याची माहिती दोषारोपपत्रातून समोर आली आहे. पोलिसांनी 1670 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. यानंतर आता विधीमंडळ समितीने अहवाल सादर केला आहे. या अहवालात हुंड्यासाठीच वैष्णवी हगवणेचा बळी घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करावी अशी शिफारस समितीने त्यांच्या अहवालात केली आहे.