मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वळण घेणारा संकेत मिळत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, 'ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं ही काळाची गरज आहे.'
किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, 'मराठी माणूस हा महाराष्ट्राचा मूळ निवासी असून सध्या परप्रांतीयांच्या दडपणाखाली आहे. अशा काळात जर ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झालं तर राज्यात एक आशादायी वातावरण तयार होईल.'
हेही वाचा: 'फिक्सिंगचा आरोप म्हणजे मतदारांचा अपमान'; गुलाबराव पाटील यांचा राहुल गांधींना टोला
त्या पुढे म्हणाल्या की, 'उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत, आणि युतीसाठी ते तयार असल्याची चिन्हं दिसत आहेत. आपणही सकारात्मक राहिलं पाहिजे.' राजकीयदृष्ट्या ही एक मोठी आणि महत्त्वपूर्ण पावलं ठरू शकते. दोन्ही बंधूंचं एकत्र येणं केवळ एक भावनिक निर्णय न राहता, महाराष्ट्रातील मराठी मतदारांच्या संरक्षणासाठी एक धोरणात्मक निर्णय ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच, पेडणेकर यांनी स्पष्ट केलं की, 'मला त्यांचं नातं काय आहे याबद्दल फारसं माहित नाही, पण दोघंही ठाकरे आहेत, आणि मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करत आले आहेत.' त्या म्हणाल्या की, 'आज मराठी माणसांवर अन्याय होत आहे, सहिष्णुताच दादागिरीत रूपांतर होत आहे. अशा वेळी एकत्र येणं ही काळाची गरज आहे.'
हेही वाचा:'नितेशने जपून बोलावे... मी भेटल्यावर...'; नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानावर निलेश राणे काय म्हणाले?
गजानन कीर्तीकर यांच्या वक्तव्याबाबत विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, 'ते काय म्हणतात किंवा तिकडे काय चाललंय, याबद्दल मला अधिक माहिती नाही. पण तिकडे मोठ्या प्रमाणात गळचेपी सुरू आहे, हेही लक्षात घ्यायला हवं.'
या पार्श्वभूमीवर पेडणेकर यांनी सडेतोड भूमिका घेत मराठी मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, यावर चर्चांना नवी दिशा मिळाल्याचं दिसतंय.
राज ठाकरे यांच्या भूमिकेवर अजूनही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही, मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून ज्या प्रकारे सकारात्मकतेचं वातावरण तयार केलं जात आहे, त्यावरून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.