गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो. यंदा राज्यभरात पारंपरिक शोभायात्रा, ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुका आणि धार्मिक विधींनी गुढीपाडव्याचे स्वागत करण्यात आले. विविध शहरांतील गुढीपाडव्याचा उत्साह जाणून घेऊया:
मुंबई (गिरगाव)
गिरगावात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला आणि उपस्थितांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात हा सोहळा अधिक भव्य ठरला तसेच विविध ठिकाणांवरून मराठमोळ्या पोशाखात उपस्थित झालेल्या तरुणाईमुळे सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला.
डोंबिवली
डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते गणेश पूजन झाले. पंचांग वाचन विधी आचार्य प्रणय यांच्या उपस्थितीत पार पडला. डोंबिवली पश्चिम भागशाळा मैदानातून निघालेल्या स्वागत यात्रेत पारंपरिक वेशभूषेतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
हेही वाचा: PM Modi Nagpur Visit: पंतप्रधान मोदी नागपूमधे दाखल; हेडगेवार स्मृतीस्थळ आणि दीक्षाभूमीला वंदन
ठाणे
ठाण्यात गुढीपाडवा निमित्ताने भव्य शोभायात्रा आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर स्थानिक नेत्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.
नागपूर
नागपुरात गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. श्रीराम आणि शंकर यांची प्रतिकृती असलेल्या रथासह पारंपरिक आदिवासी नृत्य आणि ढोल-ताशा पथकांनी वातावरण भारावून टाकले. या यात्रेचे आयोजन भाजप आमदार संदीप जोशी यांनी केले होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
संभाजीनगर
संभाजीनगरमधील पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच नाथसमाधीला अभिषेक करण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
पुणे
पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तांची मोठी गर्दी उसळली. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचे औचित्य साधत सकाळपासूनच नागरिक बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. मंदिराला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.
पंढरपूर
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने विशेष सजावट करण्यात आली. शेवंती, अष्टर, गोंडा, गुलाब यांसारख्या हजारो फुलांनी श्रींचा गाभारा सुंदर सजवला गेला.
धाराशिव
तुळजाभवानी मंदिरात पहाटे 5 वाजता गुढी उभारण्यात आली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी देवीची अलंकार महापूजा आणि रात्री छबिना सोहळा पार पडणार आहे.
जळगाव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य पथसंचलन काढण्यात आले. जळगाव शहरातील कुढापा चौकातून सुरू झालेल्या या संचलनाचे नागरिकांनी स्वागत केले.
गुढीपाडवा खरेदीचा उत्साह
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. यंदा सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन आणि घर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.