Sunday, August 17, 2025 03:44:07 AM

Maharashtra Weather : फिरण्यासाठी बाहेर पडत असाल, तर हे हवामान वृत्त नक्की वाचा

पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशभरात हवामानात पुन्हा एकदा बदल जाणवत आहेत. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये ढगाळ वातावरण असतानाच, मध्य भारतात मात्र तापमान झपाट्याने वाढत आहे.

maharashtra weather  फिरण्यासाठी बाहेर पडत असाल तर हे हवामान वृत्त नक्की वाचा

Maharashtra Weather News: उत्तरेकडील हिमालयीन राज्यांमध्ये सक्रिय झालेल्या पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशभरात हवामानात पुन्हा एकदा बदल जाणवत आहेत. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये ढगाळ वातावरण असतानाच, मध्य भारतात मात्र तापमान झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली असून त्याचे परिणाम गुजरातमार्गे महाराष्ट्रावरही दिसू लागले आहेत. राज्यात पुढील पाच दिवस तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला सध्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः पुणे, सोलापूर, सातारा, लातूर, बीड, नांदेड, धाराशिव, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण आणि मुंबई भागात ढगाळ वातावरणामुळे तापमान स्थिर असले तरीही उकड कायम आहे. सलग सुट्ट्यांचा कालावधी आणि उन्हाळी सहलींच्या हंगामामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात निसर्गसंपन्न ठिकाणी जात असले तरी या तापमानवाढीमुळे सहलीची मजा काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा: नाशकात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल दुपारी 1 ते 4 दरम्यान राहणार बंद

विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात उष्णतेचा कहर अधिकच जाणवत असून, अकोला येथे तापमानाने 44 अंशांचा टप्पा गाठला आहे. राज्याचं सरासरी तापमान 40 अंशांच्या घरात असून, उन्हाचा तीव्र झळा दिवसेंदिवस वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर जाणं टाळावं, पुरेसे पाणी प्यावं आणि थेट उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. तापमानाचा हा चढता आलेख पाहता,  बाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा अंदाज नक्की घ्या!


सम्बन्धित सामग्री