Maharashtra Weather today: पुढील 24 तास धोक्याचे! उष्णतेसोबत 'इथं' वादळी पावसाची शक्यता
Maharashtra Weather today : केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी महाराष्ट्रात हवामान वेगळं वळण घेईल. एकीकडं उष्णतेची तीव्र झळ राज्यभर जाणवत असतानाच दुसरीकडं काही भागांत पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सध्या दक्षिणेकडील कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळं वाऱ्याचं प्रमाणही वाढत आहे. ही स्थिती वादळी पावसासाठी पूरक ठरत आहे. याकारणाने विदर्भात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
राज्यात उष्णतेचा सर्वाधिक प्रभाव विदर्भावर दिसून येत आहे. अकोला येथे तापमान तब्बल 44.1 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद झाली आहे. या तीव्र उष्णतेमुळे केवळ विदर्भच नव्हे तर मराठवाडा, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांनाही गरम वाऱ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. पेरण्या आणि पिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शेतकरी वर्गासाठी ही परिस्थिती अधिकच चिंतेची ठरू शकते.
हेही वाचा - गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉ सुश्रुत घैसासांविरोधात कारवाई होणार
वादळी पावसाची शक्यता
हवामान खात्यानं पुढील 24 तासांत विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. या भागात ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही भागांत विजेच्या कडकडाटासह हलक्या सरी पडू शकतात.
हेही वाचा - सोलापूरमध्ये दर्शनावरुन येताना पती-पत्नीवर गोळीबार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम तामिळनाडूपासून ते महाराष्ट्राच्या वायव्य भागापर्यंत जाणवत आहे. राजस्थान ते विदर्भ या पट्ट्यावर सक्रिय असलेल्या दाबामुळं राज्याच्या काही भागांत पावसाचे ढग निर्माण झाले आहेत. पुढील काही दिवसांत हा दाबाचा पट्टा अधिक सक्रिय होण्याची शक्यता असून त्याचा प्रभाव तापमान घट किंवा अवकाळी पावसाच्या स्वरूपात पाहायला मिळू शकतो.