बीड: बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील पवित्र प्रभू वैद्यनाथ मंदिरात मांसाहारी अन्न शिजवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मंदिराच्या पवित्रतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
ही घटना मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान घडली. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात असलेल्या दोन कामगारांनी मांसाहारी अन्न शिजवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली असून भाविक आणि स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर मंदिर प्रशासन आणि विकासकामांचा कंत्राटदार या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत आहे. संतप्त भाविकांच्या मागणीनंतर संबंधित दोन कामगारांवर तात्काळ कारवाई करत त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.
हेही वाचा: क्षणिक मोह जीवावर बेतला: फोटो काढण्याच्या नादात तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू
वैद्यनाथ मंदिर हे महाराष्ट्रातील बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक असून लाखो भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी येत असतात. अशा पवित्र स्थळी मांसाहारी अन्न शिजवणे ही भाविकांच्या श्रद्धेवर घाला आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. मंदिर परिसरात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही होत आहे.
मंदिर परिसरात कोणतेही अपवित्र कार्य होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. विकासकाम करताना अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवणे कंत्राटदाराची जबाबदारी असते. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून कामगारांना आधीच स्पष्ट सूचना देणे, धार्मिक स्थळांची महत्त्व आणि परंपरा समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून देखील भाविकांची माफी मागण्यात आली असून, भविष्यात मंदिर परिसरात अशा घटना घडू नयेत यासाठी विशेष लक्ष दिलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. तसेच कंत्राटदारालाही इशारा देण्यात आला आहे की, अशा प्रकारचा निष्काळजीपणा भविष्यात सहन केला जाणार नाही.
या संपूर्ण प्रकरणामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, संतापलेल्या भाविकांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंदिर परिसरातील पवित्रता आणि धार्मिक संस्कृती अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक आहे.