मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर ‘Mumbai’ ऐवजी ‘Mumabai’ असे चुकीचे स्पेलिंग छापले गेल्याने मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता. अखेर, विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेत या चुकीला जबाबदार धरत डेप्युटी रजिस्ट्रार यांची बदली केली आहे. तसेच, हे केवळ एक प्रिंटिंग एरर असल्याचे स्पष्ट करत विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना दुरुस्त प्रमाणपत्रे मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबई विद्यापीठ हे भारतातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असून, दरवर्षी हजारो विद्यार्थी येथे पदवी प्राप्त करतात. मात्र, अशा लहानशा पण गंभीर चुकीमुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 1.64 लाख विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले आहेत. किती विद्यार्थ्यांना चुकीची प्रमाणपत्रे मिळाली, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर या चुकीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी आपल्या प्रमाणपत्रांचे फोटो शेअर करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले.
हेही वाचा: गुंडांसोबत केक कापून पोलिसाचा वाढदिवस,कायद्याच्या रक्षकांनीच नियम मोडले!
हा केवळ तांत्रिक दोष असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले असले तरी या घटनेने व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो, आणि अशा वेळी झालेल्या त्रुटीमुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. विद्यापीठ प्रशासनाने आता तातडीने सुधारित प्रमाणपत्रे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच ही समस्या सोडवली जाईल असे सांगण्यात आले आहे.