नाशिक : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वादग्रस्त विधान मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.
अवकाळी पावसामुळे राज्यात पिकांचे नुकसान झाले आहे. कृषीमंत्री या नात्याने माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करायचे ? ढेकळांचे पंचनामे करायचे का ? असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. घरात आणून ठेवलेल्या मालाचे पंचनामे होणार नाहीत, ते नियमात बसत नाही. शेतात नुकसान झालेल्या पिकांचे रीतसर पंचनामे केले जातील असं कोकाटे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार; उपमुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना दिलासा
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीनंतर कोकाटे यांनी पाहणी केली. अधिकारी केवळ उभ्या पिकांचे पंचनामे करत आहेत. या तक्रारीवर कोकाटे यांनी वक्तव्य केलं आहे. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करायचे?, आता ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवालही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. कृषीमंत्र्यांनी माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार असा इशारा कोकाटेंच्या वादग्रस्त विधानानंतर किसान सभेने केला आहे. पावसामुळे शेतीच्या आणि शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी, कशाचे पंचनामे करायचे? ढेकळांचे का? असे वादग्रस्त विधान कृषीमंत्र्यांनी केले आहे. कृषीमंत्र्यांनी हे विधान मागे घेत माफी मागावी आणि राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करत मदत करावी, अन्यथा किसान सभेच्या वतीने याबाबत तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी दिला आहे.