परभणी: परभणी जिल्ह्यातील झिरो फाटा येथे असलेल्या हायटेक रेसिडेंशियल स्कूलमध्ये एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) आणि फी परत मिळावी यासाठी शाळेत गेलेल्या पालकाला बेदम मारहाण करण्यात आली, आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी ठरली आहे.
उखळद गावचे रहिवासी 42 वर्षीय जगन्नाथ हेंगडे यांची मुलगी पल्लवी हायटेक रेसिडेंशियल स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. ती शाळेच्या निवासी वसतिगृहात राहत होती. मात्र लहान असल्यामुळे तिला घराची ओढ वाटू लागली आणि त्यामुळे पालकांनी तिला घरी नेले. काल (10 जुलै) जगन्नाथ हेंगडे हे शाळेत जाऊन आपल्या मुलीची टीसी मागण्यासाठी आणि भरलेली फी परत मिळवण्यासाठी गेले होते.
हेही वाचा: माजलगाव नगरपरिषदेतील भ्रष्टाचार उघड; चंद्रकांत चव्हाणांना 6 लाखांची लाच घेताना अटक
त्यावेळी शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांची पत्नी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या व हिंगोली जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांनी हेंगडे यांच्याशी वाद घालून त्यांना बेदम मारहाण केली. गंभीर दुखापतीमुळे जगन्नाथ हेंगडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हेंगडे यांचे बंधू सदानंद हेंगडे यांच्या तक्रारीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात प्रभाकर आणि रत्नमाला चव्हाण यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे झिरो फाटा परिसरात तणावपूर्ण शांतता असून शाळेच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. ते म्हणाले, 'घटना गंभीर आहे. दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल असून सखोल तपास सुरू आहे. कायदेशीर कारवाई करण्यात येईल.'
हेही वाचा: Panvel: शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर
मयताचे बंधू सदानंद हेंगडे म्हणाले, 'आम्ही फक्त टीसी मागितली होती. आमच्या भावाला पैशांबाबत विचारल्यामुळे मारहाण करण्यात आली. आम्हाला न्याय मिळावा.' ही घटना शिक्षण क्षेत्रासाठी काळीमा फासणारी आहे.