Sunday, August 17, 2025 05:19:18 PM

पुरंदर विमानतळाच्या विरोधात भूमिपुत्रांचे तीव्र आंदोलन; लाठीहल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

पुरंदर तालुक्यात प्रस्तावित विमानतळासाठी जमिनीच्या मोजणी आणि ड्रोन सर्वेक्षणविरोधात सात गावांतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध, पोलिस लाठीचार्ज . वृद्ध महिलेचा मृत्यू.

पुरंदर विमानतळाच्या विरोधात भूमिपुत्रांचे तीव्र आंदोलन लाठीहल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

पुणे: पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सुरु असलेल्या जमिनीच्या हस्तगत प्रक्रियेविरोधात स्थानिक शेतकऱ्यांचा रोष चिघळला आहे. आज भूमिपुत्रांनी सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडले. प्रशासनाच्या वतीने जमिनीची मोजणी आणि ड्रोन सर्व्हे करण्यासाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. यावेळी जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक करत संताप व्यक्त केला. याप्रसंगी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असून, यात अंजना महादेव कामठे (रा. कुंभारवळण, पुरंदर) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शासनाकडून दोन दिवसांपासून विमानतळाच्या प्रस्तावित जमिनीवर ड्रोन सर्वे केला जात आहे. मात्र, बाधित सात गावांतील ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवला होता. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता आणि विश्वासात न घेता प्रशासनाने ही प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. जमिनी गमावण्याची भीती, योग्य मोबदला आणि पुनर्वसनाच्या अभावामुळे स्थानिक शेतकरी आंदोलनाच्या मार्गावर उतरले आहेत.

प्रशासनाच्या पथकाला विरोध करत असताना ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये जोरदार गोंधळ झाला. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर आणि त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी प्रसारमाध्यमांना आंदोलकांकडून दगडफेक होत असल्याचे व्हिडिओ पुरावे दिले आहेत. सासवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी 254 आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा: राज्यावर अवकाळी पावसाचं सावट; मे महिन्यात हवामान बदलण्याची चिन्हं

ग्रामस्थांच्या मते, ही केवळ जमिनीची नव्हे तर अस्तित्वाची लढाई आहे. शेती ही त्यांची उपजीविका असून, ती हिरावून घेतल्यास त्यांना उदरनिर्वाहाचा कोणताही पर्याय राहणार नाही. यापूर्वी अनेक वेळा आंदोलने, उपोषण करण्यात आले, मात्र शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता "आमचा जीव गेला तरी चालेल पण माघार नाही" अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

या आंदोलनामुळे शासन आणि प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. वृद्ध महिलेच्या मृत्यूमुळे या मुद्द्याला भावनिक आणि सामाजिक वळण लागले असून, विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, सरकारने पारदर्शक आणि संवादातून तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


सम्बन्धित सामग्री