Saturday, August 16, 2025 01:14:40 PM

Sambhajinagar: ऐन पावसाळ्यात 79 टँकर सुरू; अजूनही 49 गावांना टंचाईच्या झळा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे 49 गावांना पाणीटंचाई निर्माण झाली असून 79 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

sambhajinagar ऐन पावसाळ्यात 79 टँकर सुरू अजूनही 49 गावांना टंचाईच्या झळा

विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे 49 गावांना पाणीटंचाई निर्माण झाली असून 79 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाळा असूनही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. प्रशासनाने काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे, तरीही अनेक गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. यात वैजापूर, सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. 

परिणामी, या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे होत असून तसेच प्रस्तावही सादर होत आहेत. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वैजापूर, सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगर उपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून आलेल्या टँकरच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.

 सिल्लोड नगर परिषद क्षेत्रासह इतर 48 गावांमध्ये एकूण 79 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ही मंजुरी 31 जुलैपर्यंत असणार आहे. मंजुरी मिळालेल्या गावांपैकी काही गावांमध्ये टँकरच्या प्रत्यक्ष खेपांना सुरुवात झाली आहे. तर, उर्वरित गावांना येत्या एक- दोन दिवसांत टँकरने पाणीपुरवठा सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: Gold Price Today: सोन्याच्या दरानं आजवरचा रेकॉर्ड मोडला, जाणून घ्या...

या गावांना टँकर..
काटेपिंपळगाव, मालुजा, हदीयाबाद, शिरेसायगाव, शंकरपूर, वडाळी, हसूल सावंगी, फुलशिवरा, दिघी काळेगाव, नरसापूर, शिरेगाव, भालगाव, खडकवाघलगाव, आगाठाण, चिंचखेडा, शहापूर, सनव, वैरागड, शिल्लेगाव, सुलतानाबाद, सिद्धनाथवाडगाव, तांदूळवाडी, बोलठाण, उत्तरवाडी, कोळघर, बुट्टेवाडगाव, वजनापूर, शेकटा, जांभाळा, घोडेगाव, महेबुबखेडा, येसगाव, डोमेगाव बोरगाव, देवळी, मेढी-खोपेश्वर, नवीन हिरापूर, वाहेगाव, रमाईनगर, गाडेकर वस्ती, हिरापूरवाडी, बाळापूर व वस्त्या, फत्तेपूर, गोलटगाव, गांधेली, रामपूर, बेगनाईक तांडा, काहोळ, एकलहरे व महंमदपूर, दरकवाडी आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.


सम्बन्धित सामग्री