सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी यंदाचा शेवटचा मासेमारी हंगाम वादळामुळे अर्धवट राहिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात वादळी स्थिती निर्माण झाली असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने मासेमारी तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक मच्छिमारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी झाली आहे.
दरवर्षी 1 जूनपासून समुद्रातील मासेमारी हंगाम बंद केला जातो. त्यामुळे उर्वरित 8 ते 10 दिवस मच्छिमारांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या कालावधीत समुद्रात मासळी मुबलक प्रमाणात मिळते व कमाईसाठी ही सुवर्णसंधी असते. मात्र, हवामान खात्याच्या इशाऱ्यांनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला आहे. जोरदार वारे आणि उंच लाटा यामुळे मासेमारीसाठी जाणे अत्यंत धोकादायक ठरत आहे.
हेही वाचा:IPL 2025: मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये दमदार एंट्री; 'या' दोन खेळाडूंनी केली चमकदार कामगिरी
सिंधुदुर्गमधील मच्छीमार बंदरांवर शुकशुकाट पसरलेला असून होड्या किनाऱ्यावर परत आल्या आहेत. काही मच्छिमारांनी आधीच खोल समुद्रात मासेमारीसाठी प्रयत्न सुरू केले होते, मात्र वादळी हवामानाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ परतण्याचा निर्णय घेतला. यामुळे मासेमारीसाठी केलेल्या इंधन, बर्फ, मजुरी इत्यादी खर्चाचा परतावा मिळाला नाही.
मच्छीमार संघटनांनी या अचानक बदललेल्या हवामानामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी केली आहे. नुकसान भरपाईसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. याशिवाय हवामान खात्याने पूर्वसूचना अजून अधिक अचूक व लवकर द्याव्यात, असेही मत व्यक्त केले जात आहे.
या वादळी स्थितीमुळे मासेमारी हंगामाच्या अखेरच्या टप्प्यावर मोठा फटका बसला असून शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. आगामी काळात अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी शासन आणि मच्छीमार यांच्यात समन्वय वाढविण्याची गरज अधोरेखित होत आहे.