Vat Purnima 2025: हिंदू धर्मातील एक पवित्र आणि सश्रद्ध सण म्हणजे वटपौर्णिमा. 2025 मध्ये हा सण १० जून रोजी साजरा होणार आहे. नवविवाहित महिलांसाठी तर हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सात जन्मांसाठी त्याच्याशी नातं टिकावं यासाठी या दिवशी वटवृक्षाची पूजा आणि उपवास केला जातो. यामागे सावित्री आणि सत्यवान यांची प्रेरणादायी कथा आहे, जी आजही स्त्रियांना समर्पण आणि श्रद्धेचं प्रतीक वाटते.
वटपौर्णिमेची पौराणिक कथा
राजर्षी अश्वपती यांना देवी सावित्रीच्या कृपेने कन्यारत्न प्राप्त झालं, जिने ‘सावित्री’ असं नाव धारण केलं. सावित्रीने सत्यवान नावाच्या वनवासात राहणाऱ्या राजकुमाराशी विवाह केला. नारदांनी तिला सांगितलं की सत्यवान अल्पायुषी आहे, तरीही सावित्रीने तिचा निर्णय बदलला नाही.
एका दिवसाच्या जंगलातील प्रवासात सत्यवान मृत्यूमुखी पडला. यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले तेव्हा सावित्रीने यमदेवाचा पाठपुरावा करत आपल्या पतीसाठी लढा दिला. तिच्या श्रद्धा, धैर्य आणि निष्ठेमुळे यमराजाने तिला तीन वरदानं दिली – सासऱ्यांना दृष्टी, त्यांचे राज्य परत मिळावं आणि स्वतःसाठी सौभाग्य. शेवटचं वर मागताच यमदेव सत्यवानाचे प्राण परत देतात.
ही घटना वटवृक्षाखाली घडली होती, म्हणून महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली पूजा करणे हे शुभ मानले जाते.
हेही वाचा: Vat Purnima 2025: जाणून घ्या व्रताची पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि खास माहिती
वटपौर्णिमा2025: शुभ मुहूर्त आणि तिथी
यावर्षी वटपौर्णिमा मंगळवार, १० जून २०२५ रोजी आहे. पूजेसाठी शुभ काळ सकाळी ११:३० वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी ११ जूनला दुपारी १:१३ मिनिटांनी वटपौर्णिमेची तिथी संपेल. विशेष ब्रम्हमुहूर्त सकाळी ११:५५ ते दुपारी १२:५१ या वेळेत आहे. या काळात पूजन केल्यास अधिक फलदायी मानले जाते.
वटवृक्षाचं अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व
वडाचं झाड केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर पर्यावरणदृष्ट्याही फार महत्त्वाचं आहे. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं निवासस्थान मानलं जातं. वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा मारून महिलांनी कच्च्या दोऱ्याने वडाच्या बुंध्याभोवती फेऱ्या मारणे हे एकनिष्ठतेचं प्रतीक मानलं जातं. या सात फेऱ्या म्हणजे सात जन्मांचं नातं असं मानलं जातं.
वटपौर्णिमा कशी करावी? पूजा विधी आणि साहित्य यादी
सकाळी लवकर उठून महिलांनी स्नान करून नित्य पूजन करावं. नंतर वटवृक्षाजवळ जाऊन खालीलप्रमाणे पूजा करावी:
साहित्य:
हळद, कुंकू, फुलं, चंदन, अत्तर, फळं
वडाचं फळ, बांबूचा पंखा
रक्षासूत्र (कच्चा सूत), तूप/तेलाचा दिवा
सत्यवान आणि सावित्रीची मूर्ती (किंवा चित्र)
नारळ, मिठाई, अक्षता, लाल कापड
ओटीसाठी गहू, नाणं, पाच फळं
पूजा पद्धत:
1. श्री गणेशाची स्थापना करून हळद-कुंकवाने पूजा करावी.
2. वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या माराव्यात आणि प्रत्येक फेरीत मनात प्रार्थना करावी.
3. दिवा लावून नैवेद्य अर्पण करावा.
4. पाच विवाहित स्त्रियांची ओटी भरावी.
5. सायंकाळी सावित्री सत्यवानाची कथा वाचावी किंवा ऐकावी.
नवविवाहित महिलांसाठी वटपौर्णिमा का खास?
या व्रताच्या माध्यमातून नवविवाहित महिलांना नात्यांमध्ये श्रद्धा, निष्ठा, आणि सहनशीलतेचं बाळकडू मिळतं. आपल्या पतीसाठी उपवास करणं, वडाच्या झाडाभोवती फिरणं, प्रार्थना करणं हे सर्व या व्रताला फक्त एक कर्मकांड न ठेवता त्यात भक्ती आणि भावना मिसळते.
आजच्या काळात वटपौर्णिमेचं महत्त्व
जरी काळ बदलला असला, तरी अनेक नवविवाहित महिलांना आजही या व्रताचं आध्यात्मिक महत्त्व समजतं. अनेक तरुण महिला या परंपरेला अंधश्रद्धा म्हणून नाकारत नाहीत, तर ती एक श्रद्धेची, एकनिष्ठतेची परंपरा म्हणून पाळतात. या दिवशी अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम, सामूहिक पूजा, आणि कथा वाचनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात.
सात जन्मांचं व्रत
वटपौर्णिमा म्हणजे केवळ एक पूजन विधी नव्हे, तर आपल्या पतीबरोबरचे नातं सात जन्म टिकावं, त्याला देवाची कृपा मिळावी ही विनंती असते. यामध्ये स्त्रीच्या श्रद्धेचं, निस्सीम प्रेमाचं आणि नात्याच्या बंधनांचं सुंदर दर्शन घडतं.
वटपौर्णिमा 2025 मध्ये केवळ धार्मिक सण म्हणून नव्हे, तर स्त्रीच्या धैर्य, समर्पण, आणि श्रद्धेचं प्रतीक म्हणून साजरी केली जावी. नवविवाहित महिलांनी या दिवशी शुद्ध मनाने, पूर्ण श्रद्धेने पूजा केली तर त्या नात्यातला गोडवा वाढतो आणि सात जन्मांची साथ लाभते, असं मानलं जातं.