मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हेगारी कारवायांमुळे मकोका कायद्याखाली अटकेत असलेले हे दोघे बीडच्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
या तुरुंगात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपीही कैद आहेत. अक्षय आठवले आणि महादेव गीते, हे दोन आरोपी शेजारच्या बॅरेकमध्ये होते. सूत्रांच्या माहितीनुसार, आधी किरकोळ वाद झाला आणि त्याचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले. त्यानंतर आठवले आणि गीते या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर हल्ला चढवला.
हेही वाचा: वाल्मिक कराडचा नवा अवतार: फिल्म प्रोड्यूसर म्हणूनही ओळख? कराडचं आयडी कार्ड सोशल मीडियावर व्हायरल
ही घटना घडल्याची माहिती मिळाली असली तरी तुरुंग प्रशासनाने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. कारागृहात आरोपींमध्ये झालेल्या या संघर्षामुळे सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. या हल्ल्यामागचे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेनंतर तुरुंग प्रशासनाकडून सुरक्षा वाढवली जाण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे कारागृहातील तणाव वाढला असून, प्रशासन यावर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.