पिंपरी-चिंचवड येथे इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आलेल्या 20 वर्षीय सहिती कलुगोटाला रेड्डी हिने 15व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सुरुवातीला हा आकस्मिक मृत्यू असल्याचे मानले गेले, मात्र पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आत्महत्येपूर्वी सहितीने आपल्या मित्रमैत्रिणींना 42 मिनिटांची ऑडिओ क्लिप पाठवली होती, जी तीन तासांनी त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी सेटिंग तिने मोबाईलमध्ये करून ठेवली होती. या क्लिपमध्ये तिने आपल्या मित्र प्रणव डोंगरेने दिलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख केला असून, शेवटी या छळाला कंटाळून आपले आयुष्य संपवत असल्याचे तिने स्पष्ट केले.
सहिती आणि प्रणव हे दोघे एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना जवळ आले, त्यांचे नाते प्रेमात बदलले. मात्र, या नात्यात प्रणव सतत तिला त्रास देत होता, टॉर्चर करत होता. या सततच्या छळाला कंटाळून तिने आपल्या आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. 5 जानेवारीच्या सायंकाळी तिने इमारतीच्या टेरेसवर जाऊन उडी घेतली. तिच्या मृत्यूनंतर तीन तासांनी मैत्रिणीच्या मोबाईलवर ती ऑडिओ क्लिप पोहोचली. आत्महत्येची बातमी आधी येऊन नंतर ती क्लिप आल्याने मैत्रिण हादरली. तिने त्वरित संबंधित टेरेसवर जाऊन सहितीच्या मोबाईलचा पासवर्ड शोधला आणि त्यामध्ये असलेली सर्व माहिती पालकांना दिली. क्लिप ऐकताच वडिलांचा संताप अनावर झाला. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर त्यांनी वाकड पोलिस ठाणे गाठून हा तपशील पोलिसांना दिला.
हेही वाचा : राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्वीटमुळे नवा वाद! नेत्यांच्या प्रतिक्रिया
पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सहितीच्या मोबाईलमधील संदेश, कॉल रेकॉर्ड आणि ऑडिओ क्लिपच्या आधारे प्रणव डोंगरेला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली असून, तरुणींच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सहितीला न्याय मिळावा अशी तिच्या कुटुंबीयांसह अनेकांची मागणी आहे.