छत्रपती संभाजीनगर, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्यात मंगळवारपासून झालेल्या तीन दिवसातील अवकाळी पावसामुळे २ हजार ७१६ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने २०१ गावांतील ४ हजार ३०१ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मराठवाड्यात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला तर अवकाळी पावसाने मोठे ५४ तर लहान १४ असे ६८ दुभते पशूधन दगावले आहे. तर ओढकाम करणारे लहान ३ आणि मोठे १३ असे एकून ८४ पशूधन दगावले आहे. ३६१ घरांची आणि नऊ गोठ्यांची पडझड झाली आहे. जालना जिल्ह्यात ५ पक्क्या घरांची थोडीफार पडझड झाली आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात ३३२, बीड जिल्ह्यात १४, धाराशिव जिल्ह्यात ४ अशा ३५६ कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. याशिवाय जालना व धाराशिव जिल्ह्यत प्रत्येकी एक, हिंगोलीत सात अशा ९ गोठे बाधित झाले आहेत.