3 Senior officials caught by anti-corruption squad At Pune
Edited Image
पुणे जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले देण्यासाठी लाच स्विकारताना या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता (दक्षिण विभाग) बाबुराव कृष्णा पवार, उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे यांचा यात समावेश आहे. लाचलुचपत विभागाच्या पुणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा -Satish Bhosale Police Custody: मोठी बातमी! सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी
लाच स्विकारल्याप्रकरणी या तीन अधिकाऱ्यांविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी माहिती दिली आहे. याप्रकरणी एका कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने जिल्हा परिषदेकडून निविदा प्रक्रियेतून मिळालेली विकासकामे पूर्ण केली होती. या पूर्ण केलेल्या कामांची देयके जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्रलंबित होती. ही रक्कम हवी असेल तर, अदा करावयाच्या एकूण रकमेच्या 2 टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी लागेल, अशी मागणी यातील अधिकाऱ्यांनी केली होती.
हेही वाचा - महालक्ष्मी मंदिरातील 51 तोळे दागिने चोरी प्रकरणातील सहा आरोपी जेरबंद
तक्रारदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 1 लाख 42 हजार रूपायांची लाच स्वीकारताना तिनही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक कल्पेश जाधव हे करत आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
कंत्राटदारांची आर्थिक पिळवणूक थांबवा -
सरकारने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना विकासकामे देण्याची तरतूद केली आहे. परंतु, केलेल्या कामांचा मोबदला मिळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांची मोठी आर्थिक पिळवणूक केली जात आहे. ही पिळवणूक कायमस्वरूपी थांबावी, अशी मागणी पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी केली आहे.