Sunday, August 17, 2025 08:03:11 AM

'मराठ्यांना कुणबीतून आरक्षण मिळावं' जरांगे मागणीवर ठाम

मराठ्यांना कुणबीतून आरक्षण मिळावं जरांगे मागणीवर ठाम

अंतरवाली सराटीतील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणादरम्यान दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. येरमाळ येथील मंदाकिनी बारकुल आणि बीड येथील भास्कर खांडे यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे हलवण्यात आले आहे. हा उपोषण ३ दिवसांपासून सुरू असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जोरात केली जात आहे.

या उपोषणात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक मराठा बांधव आणि भगिनी सहभागी झाले आहेत. या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी, एका महिला उपोषणकर्त्याची तब्येत अधिक खालावली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे, इतर उपोषणकर्त्यांची देखील स्थिती चिंताजनक आहे.

मात्र, सरकारकडून अजूनही मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधलेला नाही. अंबडच्या तहसीलदारांनी त्यांची भेट घेतली होती, मात्र त्यांचे उपोषण थांबवण्याची कोणतीही इच्छाशक्ती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही कुठल्या दहशतवादी किंवा जातीयवादी नसून, आमच्या लोकांसाठी न्याय मिळवण्यासाठी हे आंदोलन करीत आहोत."

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, "संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे. देशमुख कुटुंबाने उपोषणात सहभागी होण्याची गरज नाही, ते दुःखात आहे, त्यामुळं मीच इतर उपोषणकर्त्यांना उपोषण सोडायला सांगितलं आहे."

त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत सांगितले की, "मुख्यमंत्र्यांनी आमच्या लोकांच्या स्थितीचा विचार करावा. सरकारने आमच्या लोकांचं शोषण थांबवायला हवं. समाजाला कळलं पाहिजे की शत्रू कोण आहे.'' 


सम्बन्धित सामग्री