मुंबई: महाराष्ट्र डाक विभागाच्या वतीने मुंबई जीपीओ येथे मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन 2025 साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचा सन्मान करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा दिवस मराठी साहित्याच्या महान विभूती, कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून घोषित केला होता.
या विशेष सोहळ्यात ‘मराठी भाषा गौरव दिना’चे विशेष कैंसलेशन आणि पोस्टकार्डचे अनावरण श्री. अमिताभ सिंह, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र डाक विभाग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री. अच्युत पालव, प्रसिद्ध लेखक आणि नाटककार श्री. गणेश मतकरी, मुख्य महाव्यवस्थापक (वित्त) श्रीमती जयती समद्दार, तसेच पोस्टमास्टर जनरल (मुंबई क्षेत्र) श्रीमती सुचेता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि फिलैटलिस्टही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमादरम्यान प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या बालपणापासून कॅलिग्राफी क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा प्रवास त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. मराठी भाषा आणि पोस्ट ऑफिस यांच्या अनोख्या थीमवर त्यांनी थेट कलाकृती सादर करत आपल्या कॅलिग्राफी कौशल्याचे दर्शन घडवले.
प्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि चित्रपट निर्माते श्री. गणेश मतकरी यांनी साहित्य आणि चित्रपट माध्यमांमध्ये मराठी भाषेच्या भूमिकेवर आपले विचार मांडले. त्यांच्या अंतर्दृष्टीपूर्ण संवादाने उपस्थितांना प्रेरणा मिळाली. दरम्यान, मराठी भाषेच्या सृजनशीलतेला चालना देण्यासाठी मराठी कविता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. अमिताभ सिंह, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र डाक विभाग यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाच्या गरजेवर भर देत सर्व सहभागी आणि संयोजकांचे आभार मानले.