Sunday, August 17, 2025 05:12:59 PM

Nagpur Heatwave: जगातील 'हॉट टेन'मध्ये नागपूर शहराचा समावेश

विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला असून शनिवारी नागपूर शहरातील तापमान सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअसवर गेले. सर्वाधिक तापमान असलेल्या जगातील पहिल्या दहा शहरांमध्ये (हॉट टेन) नागपूरचा समावेश झाला आहे.

nagpur heatwave जगातील हॉट टेनमध्ये नागपूर शहराचा समावेश

नागपूर : विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला असून शनिवारी नागपूर शहरातील तापमान सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअसवर गेले. या हंगामातील तापमानाचा हा उच्चांक असून सर्वाधिक तापमान असलेल्या जगातील पहिल्या दहा शहरांमध्ये (हॉट टेन) नागपूरचा समावेश झाला आहे. जगभरातील तापमानाची नोंद ठेवणाऱ्या 'एल्डोरा वेदर' या संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे.

विदर्भात नागपूरचे तापमान सर्वाधिक नोंदवले गेले आहे. यामुळे नागपूरकरांसाठी शनिवार चांगलाच तापदायक ठरला. पुढील तीन दिवस विदर्भातील उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. शहराच्या कमाल तापमानात 24 तासांत 1.7 अंशांची वाढ झाली. नागपूरचे कालचे तापमान 43 अंश नोंदविण्यात आले होते. त्यात सुमारे पावणेदोन अंशांची भर पडली.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण

राज्यात मागील दोन आठवडे वादळी पावसाचे वातावरण होते. त्यामुळे तापमानात काहीसे चढ-उतारही झाले. सरासरी तापमान काहीसे कमी झाले होते. पण आता पावसाचे वातावरण निवळून उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, अकोला, वर्धा या तीन जिल्ह्यातील तापमान प्रथमच 44 अंशाच्या वर गेले आहे. पुढील तीन दिवस नागपूरसह अकोला, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त केली आहे. भंडारा, बुलडाणा आणि गोंदिया या तीन जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर आहे. राज्यातही सर्वाधिक तापमान नागपूर जिल्ह्यात नोंदवले गेले.
 


सम्बन्धित सामग्री