मुंबई: मुंबई विमानतळावर एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. विमानतळाच्या शौचालयातील कचराकुंडीत नवजात शिशूचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी, 25 मार्च रोजी रात्री सुमारे 10:30 वाजता समोर आला.
विमानतळ कर्मचाऱ्यांना शौचालयातील कचराकुंडीत संशयास्पद वस्तू दिसली. त्यांनी ही माहिती तातडीने सुरक्षा रक्षकांना दिली. सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता त्यांना नवजात शिशूचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी तत्काळ सहार पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी शिशूला ताब्यात घेऊन जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती शिशूला मृत घोषित केले. या प्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: गडचिरोलीत मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या अश्लील चाळ्यांनी शाळा बदनाम!
सीसीटीव्ही फूटेजची तपासणी सुरू
सहार पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून, संबंधित शौचालय आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. बाळ तिथे कोणी आणि का सोडले याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
प्रसूत महिला कोण? शोध सुरू
पोलिसांच्या मते, शिशू नुकताच जन्मलेला असल्यामुळे त्याची आई विमानतळावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विमानतळावरील प्रवाश्यांची नोंदणी आणि रुग्णालये यांची चौकशी सुरू केली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नवजात बाळाला अशा प्रकारे सोडून जाण्यामागील कारण काय असावे? संबंधित महिलेला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.