नागपूर : नागपूरात औरंगजेबाच्या कबरीवरून गुरूवारी हिंसाचाराची घटना घडली. हिंसाचारानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
नागपुरात पसरलेल्या हिंसाचारावर पोलिसांनी नियंत्रण मिळवले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. संवेदनशील भागात पुढील आदेशापर्यंत कर्फ्यू कायम असणार आहे. या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच क्यूआरटी, एसआरपीएफच्या तुकड्या देखील बंदोबस्तावर आहेत. तहसील आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झालेत तर पोलिसांकडून समाजकंटकांचा शोध सुरू आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही तपासून नागरिकांची चौकशी करून आरोपीची ओळख पटवली जात आहे. संचारबंदी असणाऱ्या परिसरात अत्यावश्यक काम असणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे.
हेही वाचा : नागपूरच्या राड्या मागचा मास्टरमाईंड अखेर सापडला..
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील या संघटनांनी आंदोलन केलं. या आंदोलनामुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवसान हिंसाचारात झालं.मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ एक मोठा गट जमला होता. या गटाने जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. त्याचवेळी विरोधी गटानेही प्रत्युत्तर म्हणून घोषणाबाजी केली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना वेगवेगळं केलं आणि जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र कालांतराने हा जमाव अधिक आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. तसेच एका पोलिस उपाध्यक्षकांवरही कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामुळे राज्यात वातावरण पेटले आहेत. यानंतर आता नागपुरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.