Sunday, August 17, 2025 05:16:11 PM

राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला

अखेर राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे.

राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. देशमुखांच्या हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड निघाल्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढील कारवाईसाठी हा राजीनामा राज्यपालांकडे सोपवण्यात आला होता. अखेर राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे.

धनंजय मुंडेंचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला आहे. देवगिरीवर रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मुंडेंना मुख्यमंत्र्यांनी समजावले. परंतु मुंडे राजीनाम्यासाठी तयार नव्हते. दरम्यान आज सकाळी मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

 

हेही वाचा : संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मोठा पुरावा हाती; हालहाल करुन मारले

कसा झाला मुंडेंचा राजीनामा

मुख्यमंत्र्यांचा सुरुवातीपासूनच मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रह होता. फडणवीसांची अजित पवारांसोबत 3 ते 4 वेळा चर्चाही केली होती. फडणवीसांनी मुंडेंनाही समजावून सांगितलं होतं. धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते. राजीनामा देणार नसाल तर मंत्रिमंडळातून काढावं लागेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. फडणवीसांच्या इशार्‍यानंतर वातावरण बदललं. फडणवीसांनी सोमवारी पुन्हा धनंजय मुंडेंना राजीनामा द्या असं सांगितलं. मंगळवारी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला. सुरुवातीपासूनच फडणवीसांची कडक भूमिका होती.

धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास

बीडमधील परळी येथे 1975 रोजी धनंजय मुंडेंचा जन्म झाला. मुंडे 1995 पासून राजकारणात सक्रिय होते. ते भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. युवा मोर्चाचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यानंतर बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.  2010ला त्यांना भाजपाकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. 2010लाच महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2013 मध्ये महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 2016 मध्ये त्यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळाले. त्यानंतर ते 2019ला मविआ सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री राहिले आहेत. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना कृषिमंत्री देण्यात आलं होतं. 2024 साली परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांना 1 लाख 40 हजार मते मिळाली आहेत. 2024 मध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम पाहत होते.  


सम्बन्धित सामग्री