मुंबई: मुंबईची लोकल ही शहरातील लाखो नागरिकांची जीवनरेषा मानली जाते. दररोज हजारो प्रवासी यामार्फत प्रवास करत असतात. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात हा प्रवास त्रासदायक ठरतो. भरगच्च गर्दीत घामाने चिंब होणं ही एक सामान्य बाब आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता 16 एप्रिलपासून 14 सामान्य लोकल फेऱ्या वातानुकूलित (एसी) लोकलमध्ये रूपांतरित केल्या जात आहेत, ज्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
या बदलानंतर दररोज धावणाऱ्या एसी लोकल फेऱ्यांची संख्या 66 वरून थेट 80 वर जाईल. यामुळे हजारो प्रवाशांना उष्णतेपासून थोडा निवांतपणा मिळेल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाव्यतिरिक्त हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि बेलापूर-उरण मार्गांवर देखील ही सुविधा लागू केली जाणार आहे. विशेष म्हणजे एकूण फेऱ्यांमध्ये कोणतीही कपात न करता, काही सामान्य लोकल फेऱ्यांना एसीमध्ये रूपांतरित केले जाणार आहे.
या एसी लोकल सोमवार ते शनिवारपर्यंत नियमितपणे धावणार आहेत. रविवार आणि इतर सुटीच्या दिवशी मात्र पुन्हा त्या फेऱ्या सामान्य लोकल स्वरूपातच चालवल्या जातील. या निर्णयामुळे विशेषतः ऑफिसकामी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आरामदायी आणि थोडकासा शांत प्रवास अनुभवता येणार आहे.
कल्याण, ठाणे, बदलापूर आणि सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या काही विशिष्ट वेळांमधील लोकल फेऱ्यांमध्ये एसी डबे असतील. उदाहरणार्थ, सकाळी 7.34 ची कल्याण-सीएसएमटी, 10.42 ची बदलापूर-सीएसएमटी व संध्याकाळी 6.5 ची सीएसएमटी-ठाणे अश्या काही निवडक एसी लोकल्स आहेत. या सुविधेमुळे प्रवास अधिक आरामदायी, जलद आणि उन्हापासून संरक्षण देणारा ठरणार आहे.