Wednesday, July 02, 2025 07:06:06 AM

मुंबईतील पेटंट मुख्यालय दिल्लीला नेणार? आदित्य ठाकरे-पीयूष गोयल यांच्यात खडाजंगी

पेटंट मुख्यालय स्थलांतरावरून गोयल-आदित्य ठाकरे यांच्यात वाद-प्रतिवाद

मुंबईतील पेटंट मुख्यालय दिल्लीला नेणार आदित्य ठाकरे-पीयूष गोयल यांच्यात खडाजंगी

पेटंट मुख्यालय स्थलांतरावरून गोयल-आदित्य ठाकरे यांच्यात 'एक्स'वर शाब्दिक युद्ध

मुंबई : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) मुख्यालय दिल्लीला स्थलांतरित करण्यात येत असल्याच्या दाव्यावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आणि केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यात 'एक्स'वर शाब्दिक चकमक झडली. मुख्यालय स्थलांतरित करण्यात येत असल्याची टीका आदित्य यांनी केल्यानंतर हा आरोप अर्धवट माहितीतून करण्यात येत असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील अँटॉप हिल येथे असलेले पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क (सीजीपीडीटीएम) मुख्यालय गुजरातमधील अहमदाबाद येथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, डिसेंबर २०२४ मध्ये हे मुख्यालय दिल्लीतील द्वारका भवन येथे नेण्याचा आदेश काढण्यात आला आहे. पुढील तीन महिन्यांत हे स्थलांतर होणार असल्याचे समजते.

आदित्य ठाकरे यांनी 'एक्स'वरून या निर्णयावर टीका करत, संपूर्ण मुख्यालय दिल्लीला स्थलांतरित होत असल्याचा आरोप केला. या आरोपाला उत्तर देताना पीयूष गोयल यांनी, "हे दावे अर्धवट माहितीच्या आधारावर करण्यात आले असून यात तथ्य नाही. केवळ प्रशासकीय आणि अर्थ विभाग दिल्लीला नेण्यात येत आहे. मुंबईतील ट्रेडमार्क आणि पेटंट कार्यालय नोंदींसाठी पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहील," असे स्पष्ट केले.

पण, प्रशासन आणि अर्थ विभागाशिवाय मुख्यालय मुंबईत काय करेल, असा प्रतिप्रश्न आदित्य यांनी केला. तसेच, हे दोन महत्त्वाचे विभाग दिल्लीला नेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणीही त्यांनी केली. "मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे आणि बौद्धिक संपदा हक्कांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. अशा ठिकाणाहून हे मुख्यालय स्थलांतरित करणे योग्य नाही," असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, गोयल यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले, "अशा प्रकारच्या खोट्या आरोपांमुळेच महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला नाकारले आहे." यावर आदित्य यांनी प्रत्युत्तर देत, "महाराष्ट्राच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कायम लढत राहू. प्रशासन आणि अर्थ विभाग नसलेल्या मुख्यालयाला काय अर्थ आहे?" असा सवाल केला.

या वादामुळे पेटंट मुख्यालय स्थलांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या निर्णयाचा उद्योगजगतावर आणि मुंबईच्या प्रतिष्ठेवर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 


सम्बन्धित सामग्री