Saturday, August 16, 2025 01:10:29 PM

Abu Azmi : 'औरंगजेब क्रूर नव्हता,' म्हणणं अबू आझमींना भोवलं, अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेबाबद्दल (Aurangzeb) केलेलं वक्तव्य त्यांना चांगलेच भोवलं असून अबू आझमींवर सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे.

abu azmi  औरंगजेब क्रूर नव्हता म्हणणं अबू आझमींना भोवलं अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय

मुंबई: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेबाबद्दल (Aurangzeb) केलेलं वक्तव्य त्यांना चांगलेच भोवलं असून अबू आझमींवर सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव आज सभागृहात मांडला असून यावर बहुमताने अधिवेशन काळात अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहाने स्वीकारला आहे. त्यामुळे अबू आझमींनी औरंगजेबाचे केलेलं उदात्तीकरण चांगलेच भोवलं आहे. याशिवाय, याच मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या विषयावर भाष्य करताना छावा सिनेमातील एक शेर ऐकवला. यामुळे अख्खं सभागृह छत्रपती संभाजीराजांच्या वीररसाने चेतवल्याचे बघायला मिळाले आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी सभागृहात महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) आणि  अबू आझमींच्या वक्तव्यावरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यावर उत्तर देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. अबू आझमी यांनी ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. आज भाजपा व शिवसेना (शिंदे) आमदारांनी विधानसभेत या वक्तव्यावरून गोंधळ घातला. अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली. या प्रकरणी आता अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

हेही वाचा - Sharad Pawar on Dhananjay Munde : 'धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस...' शरद पवारांचं जुनं वक्तव्य व्हायरल

चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव भाजप आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्यानंतर अबू आझमी यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं. चंद्रकांतदादा पाटील यांनी सादर केलेल्या अबू आजमींच्या निलंबनाच्या प्रस्तावात अजून काही बाबींचा समावेश करण्याची आवश्यकता आहे. विधान परिषदेच्या या प्रस्तावात अबू आजमींचे निलंबन हे केवळ या अधिवेशनापुरतेच का, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण देव किंवा देवापेक्षा जास्त मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अबू आझमींनी केला आहे. औरंगजेब हा लुच्चा आणि लफंगा होता. औरंगजेबाच्या बापानेही काय म्हटलं आहे? शहाजहाँने सांगितलं होतं की उन्हाळा वाढला आहे माझं प्यायचं पाणी वाढवा, तेव्हा लुच्चा, लफंगा औरंग्या काय म्हणतो? जिंदा रहना है तो रहो नही तो मर जाओ. जो स्वतःच्या बापाला असं म्हणतो आहे त्याची भलावण अबू आझमी कशी काय करतात? विधान परिषदेमध्ये एका सदस्याने भर सभेत जाहीर देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल भाष्य केलं. तेव्हा तुम्ही काय शिक्षा केली? त्यावेळी आमदारांची समिती गठित करण्यात आली, तोपर्यंत त्याचे सदस्यत्व रद्द केलं. सोबतच त्याचा पगार रद्द केला. रेल्वे कुपन बंद केलं. आमदार निधीही बंद केला. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देवापेक्षा जास्त मानतो. नथुराम गोडसे बद्दल एकाने वक्तव्य केलं तर त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा हा अप्रत्यक्षपणे अपमान नाही आहे का? असेही ते म्हणाले. 

पुढे मुनगंटीवार म्हणाले, 'मी चंद्रकांत पाटील यांना सांगू इच्छितो की, प्रस्तावात बदल करा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अपमान झाल्यास कुठल्याही आयुधाची मर्यादा बाळगू नये, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, एक लाख कवट्यांचा महाल बांधणारा तैमूरलंग नाही. तसंच छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा औरंग्या आणि त्याचं भलावण करणारे अबू आझमी यांचं निलंबन दीर्घ काळासाठी करावं अशीही मागणी मुनगंटीवार यांनी केली. प्रस्ताव सभागृहात सादर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यासाठी आमदारांचा कौल घेतला. त्यानंतर अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

हेही वाचा - Navneet Rana: '...त्‍यांनी औरंगजेबाची कबर आपल्‍या घरी न्‍यावी,' नवनीत राणा यांचा हल्लाबोल

..जंजीर मे जकड़ा शंभू राजा मेरा, अब भी सब पे भारी हैं
औरंगजेब बदमाश, लुच्चा, लफंगा आणि छत्रपती संभाजी महाराज छावा आमच्यासाठी अभिमान, स्वाभिमान आणि गर्व आहे. औरंगजेबाने स्वतः आपल्या बापाला कैद करून त्याला पाणी देखील पाजले नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा त्याने पाणी मागितलं तेव्हा औरंग्याने बापाला जिवंत राहायचं असेल तर राहा, अथवा मर असं सांगितलं. यावर शहाजहानने कवितेतून प्रत्युत्तर देताना म्हटलं की, तुझ्यापेक्षा इथले  भारतीय बरे, तू जिवंतपणी आपल्या बापाला पाणी देत नाही. पण हा देश आणि इथले लोक पितृपक्षात आपल्या मेलेल्या पूर्वजांचीही पूजा-अर्चना करून पाणी पाजतात. त्यात तू कसा पुत्र आहेस, जो जिवंत बापालाही पाणी देत नाहीस. सध्या देशभरात छावा सिनेमा सुरू आहे. त्या छावा सिनेमातील एक कवी कलशांचा संवाद आहे, त्यात ते म्हणतात 'हाथी-घोड़े, तोफ,तलवारे फौज तेरी सारी हैं, पर जंजीर मे जकड़ा शंभूराजा मेरा अब भी सब पे भारी हैं,' अशा शब्दांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात भाष्य केलं.


सम्बन्धित सामग्री