मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'महादजी शिंदे'यांच्या नावाचा पुरस्कार राशप गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दिला. या कार्यक्रमात शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती करत नागरी समस्यांची जाण असलेला नेता, अशा शब्दात त्यांचे कौतुक केले. पवारांनी केलेले हेच कौतुक ठाकरे गटाच्या नेत्यांना जिव्हारी लागलंय. या कार्यक्रमानंतर खासदार संजय राऊतांनी त्यावर आगपाखड करत पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावल्याचा आरोप केला. तर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी पवारांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.
शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला थेट प्रत्युत्तर दिले नसले तरी रोहित पवार यांनी राऊतांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं. पवारांनी केलेले वक्तव्य ठाकरे कुटुंबीयांच्या जिव्हारी लागल्याचे आज स्पष्ट झाले. आदित्य ठाकरे यांनी दोन दोन दिवसांचा दिल्ली दौरा केला. यात त्यांनी त्यांच्या दौऱ्यात काँग्रेसचे नेते राहूल गांधी, आपचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेत देशातील इंडिया आघाडीबाबतची चर्चा केली. या दोन दिवसांच्या दौऱ्यात आदित्य यांनी पवारांची भेट घेण्याचे टाळल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रातील आघाडीचे नेते दिल्लीत गेले आणि पवार दिल्लीत असतील तर त्यांची भेट घेतात असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला असला तरी त्यांनी आदित्य ठाकरे पवारांना भेटले नाहीत, यावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.
हेही वाचा : शक्तिप्रदर्शन करत राजन साळवी शिवसेनेत
ठाकरे गटाचा राग काय?
महायुतीची सत्ता आल्यानंतर पवारांनी भाजपावर आरोप करण्याचे टाळले. पवारांनी आरएसएसच्या कार्यपध्दतीचे कौतुक केले. आरएसएसच्या कार्यपध्दतीमुळेच भाजपाचा विजय झाल्याचा दावा त्यांनी केला. बीड आणि परभणी प्रकरणी पवारांनी फडणवीसांची बाजू घेतली. यात एकट्या फडणवीसांना जबाबदार धरता येणार नाही, असं सांगितलं. दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. सत्कारात एकनाथ शिंदेंबाबत तोंडभरून कौतुक केलं. पवारांचे हेच कौतुकाचे बोल ठाकरेच्या जिव्हारी लागलेत .
पवारांवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांचे आदित्य यांनी समर्थन केलं आहे. आम्ही एखाद्या पक्षाच्या नेत्यांना भेटलो असेल तर ते पक्ष फोडणारे, कुटुंब फोडणारे नव्हते असं सांगत आदित्य यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा पवारांनाच लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा : छगन कमळ बघ; मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक वक्तव्य
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकरे गटाच्या आरोपांवर कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पवारांनी महायुतीच्या नेत्यांचे कौतुक केले म्हणून आगपाखड करणारे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला गेले तेव्हा आम्ही त्यावर सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती.असा पलटवार राशपचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी पवारांच्या विधानावर आगपाखड केली असल्याने भविष्यात पवारांकडून ठाकरे गटाला त्याची राजकीय किंमत नक्कीच चुकवावी लागणार आहे.