मुंबई: शासनाकडून राज्यातील 328 कंपन्यांना मद्यविक्री परवाना दिला जाणार आहे. म्हणजेच काय तर नवीन परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना मिळणार आहेत. मात्र हे परवाने भाड्याने देण्याची मुभा आहे. महसूल वाढवण्याच्या उद्देशाने कंपन्यांना परवाने दिले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मद्यविक्री परवाना समितीचे अध्यक्ष आहेत. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत.
मद्यविक्री दुकानांना परवाने देण्याची जी समिती आहे, त्यात अजित पवारांना पद देऊ नये. कारण अनेक साखर कारखान्यात ते संचालकपदी आहेत. तसेच कॅपोव्ही टेस्ट नावाच्या कंपनीत त्यांचा मुलगा जय पवार हा डायरेक्टर आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
हेही वाचा: Maharashtra Liquor Policy: राज्यात 328 मद्यविक्री कंपन्यांना नवीन परवाने दिले जाणार
अंजली दमानिया म्हणाल्या, "अनेक साखर कारखान्यात ते संचालक पदी आहेत. कॅपोव्ही टेस्ट नावाच्या कंपनीत त्यांचा मुलगा जय पवार हा डायरेक्टर आहे. त्यामुळे मद्यविक्री दुकानांना परवाने देण्याची जी समिती आहे. त्यात अजित पवार यांना पद देऊ नये. अजित पवार अदाणी, अंबानीपेक्षा कमी नाही. हे देश सेवा करायला नक्कीच आले नाही आहेत".
'खर्च होतोय उत्पन्न तर वाढलं पाहिजे'
लाडकी बहीण योजना, शिव भोजन, सारथी पार्थी महाज्योती या सगळ्या विद्यार्थ्यांना पैसे द्याचे असतील तर कधी येतील. खर्च होतोय उत्पन्न तर वाढलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी निर्णय घेतला असेल असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. अर्थात अजितदादा त्या खात्याचे मंत्री आहे. त्या खात्याचा कारभार जास्तीत जास्त टॅक्स गोळा करणे आहे. लोकांना खर्चायला पैसे देणार. त्याप्रमाणे ते अध्यक्ष होणार स्वाभाविक आहे. इतर पक्षाचे लोकसुद्धा त्यात आहेत. त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळणार आहे असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
शासनाकडून राज्यात 328 नवीन मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत. परंतु हे नवीन परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना दिले जाणार आहेत. एका कंपनीला 8 मद्यविक्रीचे परवाने दिले जाणार आहेत. परवाने भाड्याने देण्याची मुभा आहे. महसूल वाढवण्याच्या उद्देशाने शासनाने मद्यविक्री कंपन्यांना परवाने देण्याचे आयोजन केले आहे