नागपूर: महाराष्ट्र राज्याची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरात झालेल्या 580 शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये एक नाही, दोन नाही, तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. सोबतच, या बोगस नियुक्त्या आणि पगारांमुळे सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये बुडवल्याचे प्रकरण समोर आले आहे आणि शिक्षण विभागाने स्वतः आपल्या एका आदेशात हे मान्य केले आहे. दुसरीकडे, या प्रकरणाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि पोलिसांना या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दोषी आढळल्यास बोगस शिक्षकांचे पगार परत घेण्याचा इशारा
शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये कोणत्याही दोषीला सोडू नये अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिली. बोगस शिक्षक दोषी आढळल्यास त्यांचे वेतन परत घेण्याचे संकेतही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री घेणार या घटनेची गंभीर दखल
नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे आणि प्रशासनाला कारवाई करण्याचे कडक आदेश त्यांनी दिले आहेत. बनावट शालेय ओळखपत्रांचा वापर करून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकरणात, एकट्या नागपूर विभागामध्ये 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे, आता पोलिस बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात जमा झालेल्या पगाराच्या नोंदी देखील तपासणार असल्याची माहिती आहे.