कोल्हापूर: 'महाराष्ट्रात आर्थिक संकटाने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अशातच, सरकारच्या अंदाज समितीच्या सदस्यांनी ५ हजार रुपयांच्या चांदीच्या थाळ्यांमध्ये मेजवानी उडवल्याने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत', असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यातील कंत्राटी कामगारांचे पगार थकीत आहेत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाहीये, रोजगार हमी योजनेअंतर्गत पगार उशिरा मिळत आहेत. अशातच, कंत्राटदारांचे 70,000 कोटी रुपयांचे थकबाकीदार आहेत. अंगणवाडी सेविकांना त्यांचे मानधन मिळत नाहीये. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, अवकाळी पावसाचा पंचनामा होत नाहीये. दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारच्या अंदाज समितीच्या मेजवानीने संतापाची लाट उसळली आहे.
हेही वाचा: आरोपीला व्हीआयपी वागणूक दिल्याप्रकरणी तीन पोलिस निलंबित
राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला की, 'तुम्ही कितीही सुरक्षा व्यवस्था लावली तरी जनता रस्त्यावर येईल आणि तुम्हाला तुडवेल आणि गटारात फेकून देईल'. त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर आणि लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यावर जोरदार टीका केली. राज्य सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, कंत्राटी कामगार आणि अंगणवाडी सेविका त्रस्त आहेत. अशा वेळी सरकारी समितीने आयोजित केलेला भव्य मेजवानी म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. 'राज्याच्या आर्थिक संकटावर तातडीने उपाययोजना न केल्यास जनतेचा रोष तीव्र होईल', असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.