छ. संभाजीनगर: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एक एक नेते पक्ष सोडत आहेत. अशातच, सोमवारी छ. संभाजीनगर येथे लोकसभेचे माजी सदस्य चंद्रकांत खैरे आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य अंबादास दानवे यांच्यातील वाद शिखरेवर गेला आहे. 'अंबादास दानवे पक्ष संपवत आहेत, ते मला विचारत नसून ते मस्तीत आले आहेत', असा धक्कादायक आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. 'मी अंबादास दानवेंची मातोश्रीवर तक्रार करणार असून त्यांच्यावर कारवाई करायला लावणार', असं देखील चंद्रकांत खैरे म्हणाले. त्यामुळे शिवसेनेत आता उभी फूट पडल्याचं दिसत आहे.
चार महिन्यातच दानवेंचं पद जाणार
'मला अंबादास दानवे यांनी काहीही सांगितले नाही. मी स्पष्टपणे सांगतो की मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दानवेंविरोधात तक्रार करणार आहे. तो दानवे स्वतःला मोठा समजतो. दानवे आता फक्त चार महिनेच विरोधी पक्षनेता म्हणून राहणार आहे. त्यानंतर त्यांचं पद जाणार आहे', अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
दानवे काड्या लावण्याचं काम करतात
'बुधवारी आमची बैठक होणार आहे. तेव्हा या बैठकीमध्ये मी उद्धव ठाकरे यांना दानवेंविरोधात सगळं सांगणार आहे. तुम्ही आम्हाला कचरा समजता का? अंबादास दानवे हे नंतर आले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी काड्या लावण्याचे काम करत आहेत. जे मला अजिबात आवडत नाही', असा हल्लाबोल चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
अंबादास दानवेंचे स्पष्टीकरण
माझ्या माहितीप्रमाणे, नागपूरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या समाजाचा एक मेळावा होता. या मेळाव्यासाठी चंद्रकांत खैरे गेले होते. मागच्या काही काळात त्यांनी माझ्याविषयी बरंच काही बोलले. पण मी त्यांना कधीच त्याचं उत्तर दिलं नाही. आतादेखील मी यावर काहीही उत्तर देणार नाही. त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमाला दांडी का मारली हे तुम्ही त्यांनाच विचारा. मला याबद्दल काहीही विचारू नका', असं खैरेंनी केलेल्या आरोपांवर अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिले.