Importance of Daughter's Birth : बाळाचा जन्म आई-वडिलांसाठी एक खास आणि आनंददायी घटना आहे. भारतीय संस्कृतीत मुलीचा जन्म हा आई-वडिलांसाठी भाग्यवान मानला जातो. लेकीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. मुलगी कुटुंबाला एक नवीन ऊर्जा आणि आनंद देते. मुलीचा जन्म हा त्या कुटुंबाच्या प्रगतीचा संकेत मानला जातो. तसेच, भारतीय संस्कृतीत दानाचे महत्त्व मोठे मानले गेले आहे. यातही कन्यादान हा माता-पित्यांच्या जीवनातील खूप मोठा क्षण मानला जातो. यातून पुण्य मिळते आणि वैकुंठप्राप्ती होते, असे धर्मग्रंथांमध्ये म्हटले आहे.
ज्या घरात एकच मुलगी आहे, तो त्या आई-वडिलांचा शेवटचा जन्म असतो, यानंतर अशा व्यक्तींना मोक्ष मिळतो, असे मानले जाते. जगात अनेक लोक मुलाच्या हवा या इच्छेसाठी अनेक मुलांना जन्म देतात आणि मुलगा व्हावा, या हव्यासापोटी, त्यांच्या घरी एकाऐवजी अनेक मुली जन्माला येतात. मात्र, या मुलींना मुलाच्या तुलनेत सन्मानाची आणि बरोबरीची वागणूक मिळत नाही.हे अत्यंत चूक आहे. तसेच, हे शास्त्र आणि धर्मसंमतही नाही. अशा घरांमध्ये शांती, समाधान राहत नाही. मुलगा आणि मुलगी यांच्यात दुजाभाव करणाऱ्यांवर माता लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबाला तिच्या रोषाला सामोरे जावे लागते.
हेही वाचा - Worship Lord Shiva On Monday : सोमवारी हे 5 उपाय करा, भगवान शिव होतील प्रसन्न; लवकरच पूर्ण होईल इच्छा
घरात सकारात्मकता
मुलगी घरामध्ये सकारात्मकता आणि प्रेम वाढवते. तिच्या उपस्थितीमुळे घरातील वातावरण सुंदर आणि आनंदी बनते. मुलगी कुटुंबात आल्यानंतर तिचं हसणं, खेळणं आणि निरागस स्वभाव कुटुंबाला एक नवीन ऊर्जा आणि आनंद देतो. अनेकदा मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी कुटुंब आर्थिक योजना बनवतात, ज्यामुळे त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळण्यास मदत होते. तसेच, आर्थिक शिस्तही अधिक चांगल्या प्रकारे पाळली जाते.
वडिलांच्या डोक्यावर असलेलं ऋण चुकतं करण्यासाठी मुलाचा जन्म
अशी एक धारणा आहे की, वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी मुलगा जन्माला येतो. तुमच्या मागील जन्मातील कोणत्याही प्रकारचं कर्ज मुलाच्या जन्माने फेडलं जातं, असं म्हटलं जातं. मृत्यूनंतर मुलगा जलदान करतो आणि मुलाने कुटुंबातील सर्व चालीरीती व परंपरा पुढे न्याव्यात, अशी अपेक्षा ठेवली जाते.
कोणत्या कारणाने मुलाचा जन्म होतो?
काही मान्यतांनुसार, मुलाचा जन्म हा वडिलांचा दुसरा जन्म मानला जातो. मुलाने आपल्या वडिलांची काळजी घ्यावी आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी, अशी परंपरा पूर्वापार चालत आहे. त्यामुळे आताही हीच अपेक्षा ठेवली जाते. मुलगा आपल्या वडिलांचा वंश पुढे चालवतो. प्रत्येक परिस्थितीत आपल्या आई-वडिलांची सेवा करणं हे मुलाचं कर्तव्य मानलं जातं.
लेकीमुळे मोक्ष मिळतो
भारतीय संस्कृतीत मृत्यूसमयी मोक्ष आणि वैकुंठप्राप्ती होणं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुमच्यावर मागील जन्मातील कोणतंही कर्ज शिल्लक नसेल, तर तुम्हाला मुलगा होणार नाही, फक्त मुलगीच जन्माला येईल. मुलीचं कन्यादान करून तुम्ही मोक्ष मिळवू शकता. ज्या व्यक्तीवर आयुष्यात कोणतंही ऋण उरलेलं नाही, त्याला मुलगी होते, असं म्हणतात. अशा व्यक्तीचा हा शेवटचा जन्म असतो, ज्यानंतर त्याला मोक्ष मिळतो आणि वैकुंठप्राप्ती होते, अशी धारणा आहे.
हेही वाचा - Ram Navami 2025: रामनवमीला बाळाचा जन्म झालाय? चिमुकल्यांसाठी श्रीरामावरून ही खास नावं अर्थासहित..
मुली इच्छा पूर्ण करतात
शास्त्रानुसार, घरात मुलगी असणं खूप शुभ मानलं जातं. काही पुरुषांचं नशीब तर त्यांच्या घरात मुलगी जन्माला आल्यावरच उजळतं, असं म्हटलं जातं. मुलगी नेहमी आपल्या वडिलांची कीर्ती वाढावी आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी प्रार्थना करते.
सकाळी उठल्यानंतर मुलीचा चेहरा पाहणं शुभ
असंही म्हटलं जातं की, सकाळी उठल्यावर वडिलांनी सर्वात आधी आपल्या मुलीचा चेहरा पाहावा. मुलीचा चेहरा पाहिल्याने तुमची मोठ्यातली मोठी कामं यशस्वी होतात. जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडाल, तेव्हा बाहेर जाण्यापूर्वी आपल्या मुलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवा, तिचे कौतुक करा आणि तिच्या हातांचे चुंबन घ्या. असं केल्याने तुमचं काम योग्य प्रकारे तडीस जाईल, अशी मान्यता आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)