PAK vs BAN: पावसाने खेळ केला! पाकला एकही विजय न मिळवता स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तान संघावर नाचक्कीची वेळ आली आहे. यजमान संघ एकही सामना जिंकू शकला नाही आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपूष्ठात आले. आज स्पर्धेतील नववा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रंगणार होता. पण पावसाने खोडा घातला त्यामुळे सामना रद्द झाला. पाकिस्तानसोबत बांगलादेश देखील स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. त्यामुळे घरच्या मैदानावर त्यांच्याकडून दमदार प्रदर्शनाची अपेक्षा होती. मात्र या संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानला एकही विजय मिळवता आला नाही. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने त्यांचा धुव्वा उडवला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. तिसरा सामना बांगलादेशविरुद्ध होता. तो सामना पावसामुळे होऊ शकला नाही. बांगलादेश संघानेही या स्पर्धेत एकही विजय मिळवलेला नव्हता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ते विजयी होऊन काहीसं समाधान मिळवू शकले असते. पण पावसाने त्यांचे स्वप्नही उद्ध्वस्त केले. आजचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला.
हेही वाचा - Champion Trophy 2025: वसीम अक्रम पाकिस्तान क्रिकेट संघावर चिडला..
पावसामुळे नाणेफेकही झाली नाही
भारताच्या वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता उभय संघातील हा सामना सुरू होणार होता. मात्र लाहोरमध्ये मुसळधार पावसाने सामना सुरू होण्याआधीच संकट उभे केले. खेळपट्टी आणि मैदान ओले झाल्यामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. सततच्या पावसामुळे अखेर सामना अधिकृतरित्या रद्द करण्यात आला.
पाकिस्तानला तब्बल 29 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. पण भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिल्याने त्यांचे सामने दुबईत हलवण्यात आले. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर आधीच दबाव होता. त्यातच संघाची खराब कामगिरी आणि आता पावसामुळे झालेला सामना रद्द झाल्याने पाकिस्तान टीमच्या चाहत्यांसाठी ही स्पर्धा निराशजनक ठरली आहे.
भारत आणि न्यूझीलंडचा सेमीफायनलमध्ये प्रवेश
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘अ’ गट मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व दाखवले. त्यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे पाकिस्तान आणि बांगलादेशला एकही विजय मिळवता आला नाही. त्यामुळे त्यांना गाशा गुंडाळावा लागला.