Viral News : Cat Refuses To Leave From Plane: इटलीची राजधानी रोमहून जर्मनीला जाणाऱ्या रेयानएअरच्या एका विमानाला उड्डाण करायला उशीर झाला.. एक-दोन तास नव्हे.. तर चक्क दोन दिवस.. माहीत आहे, हा उशीर कशामुळे झाला? कारण समजल्यावर तुम्हाला हसूही येईल आणि आश्चर्यही वाटेल. एका हट्टी मांजरीमुळे विमानाचं उड्डाण दोन दिवस थांबवावं लागलं..!
एवढ्याशा मांजरीमुळे प्रवाशांनी भरलेल्या एवढ्या मोठ्या विमानाचे उड्डाण उशिरा करावे लागले.. तेही चक्क दोन दिवस..! ही बाब इतकी धक्कादायक होती की, याची बातमी येताच ती लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली. मांजरीमुळे विमानाचं उड्डाण का थांबवलं गेलं, हे जाणून घ्यायची सर्वांना उत्सुकता होती.
मांजर-कुत्र्यांची अनेकांना हौस असते. आपण स्वतः पाळलेल्या लळा लागलेल्या कुत्र्या-मांजरांच्या खोड्याही गोड वाटतात. तर, अशीच एक खोडकर मांजर रोमहून जर्मनीला जाणाऱ्या रेयानएअरच्या जेटमध्ये एक घुसली. अर्थात ती पालीव नव्हती.. पण तिने तिथं ठाणच मांडलं.. एखाद्या छोट्या हट्टी मुलासारखी ती तिथून बाहेर पडायलाच तयार नव्हती..! त्यामुळे तिचा हट्ट सर्वांना पुरवावाच लागला..
हेही वाचा - World Record : हे आहेत 100 हून अधिक नातवंडे असलेले आजी-आजोबा! ब्राझीलच्या जोडप्याचा वैवाहिक आयुष्य जगण्याचा विश्वविक्रम
पकडता पकडता सर्वांची दमछाक
या मांजरीने विमान रोममध्ये 2 दिवसांपेक्षा जास्त काळ अडकवून ठेवले. त्यामुळे प्रवाशांना तर मांजरीने जवळजवळ विमान 'हाय-जॅक' केल्यासारखेच वाटू लागले. गेल्या आठवड्यात बोईंग 737 विमान रोमहून जर्मनीला जाणार होते. या विमानासोबत असा आगळा-वेगळा प्रकार घडल्याचे वृत्त आहे.
ज्यावेळी क्रू मेंबर्सना 'म्याँऊ' आवाज ऐकू आला, तेव्हा ते हा आवाज कुठून येतोय याचा शोध घेऊ लागले. देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विमानाचे अनेक पॅनेल देखील काढून पाहिले. पण मांजर काही सापडेना. पण जेव्हा त्यांनी विमानाच्या इलेक्ट्रिकल बे एरियामध्ये मांजरीचा शोध घेतला तेव्हा त्यांना तिथे एक मांजर लपलेली आढळली. केबिन क्रूला तिला तिथून बाहेर काढताना खूप त्रास झाला.
मांजर केबिनमध्ये पळून गेली...
एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मांजरीला पकडण्यासाठी, क्रू मेंबर्सनी केबिनमध्ये टॉम अँड जेरीची शर्यत सुरू केली. पण मांजरीला विमानातून बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न करूनही, त्यांना यश आले नाही आणि मांजर परत जाऊन जिथे ती आधी लपली होती, त्याच ठिकाणी लपली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण रद्द करावे लागले. दोन दिवसांपर्यंत, क्रू मेंबर्सनी या मांजरीवर लक्ष ठेवण्यासाठी विमानातून पॅनेल देखील काढले.
पण मांजर विमानाच्या इतर भागांतही फिरत होती. त्यामुळे तिचा माग काढणे अशक्य झाले. जर मांजर विमानाच्या एखाद्या भागात अडकून बसली तर ती कोणाच्याही नकळत मरू शकते, अशी चिंता विमानतळ कर्मचाऱ्यांनाही होती. अशा परिस्थितीत, या विमानाला मांजर स्वेच्छेने बाहेर पडेपर्यंत 2 दिवस उशीर झाला होता. 2 दिवसांनी, मांजर स्वतःहून विमानातून बाहेर आली.
अन् सर्वांनी केलं हुश्श..
ती पायऱ्या उतरून एका उघड्या गेटमधून धावपट्टीवर आली. त्यामुळे असं वाटत होतं की, जणू काही घडलंच नाही. मांजर अशा प्रकारे विमानात घुसल्यामुळे प्रवाशांचा 2 दिवसांचा खोळंबा झाला. मांजरीला वाचवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न खूप जास्त होते, असे काही लोकांना वाटले. पण सूत्रांच्या माहितीनुसार, 30 हजार फूट उंचीवर मांजरीला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकत होते. याव्यतिरिक्त, विमान कंपनीला हजारो डॉलर्सचे नुकसान होऊ शकले असते. विमान आकाशात असताना एखादा अपघात होणे शक्य होते. यामुळे कोणतीही जोखीम न पत्करता दोन दिवस वाट पाहणेच सर्वांनी पसंत केले.
हेही वाचा - Viral Video : रिक्षा की मिनीबस? पाच-सहा नाही, चक्क 19 जण कोंबून भरले.. पोलीस म्हणाले, 'पूरी फौज..!'