विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील एका शिक्षकाने सरपंचाच्या नावाखाली शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशांमध्ये कमिशन मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणाची दखल जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने घेतली. त्यानंतर पैठणचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी राम केदार, शेख मुश्ताक, केंद्रप्रमुख मधुकर शेळके आदींचे पथक चौकशी करण्यासाठी मंगळवारी 8 जुलै रोजी वडजीतील जिल्हा परिषदेच्या संबंधित शाळेवर दाखल होऊन त्या शिक्षकाची चौकशी केली. परंतु या पथकाने ही चौकशी थातूरमातूर केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. चौकशी करून दोन दिवस उलटले तरीही त्या शिक्षकाची झालेली चौकशी गुलदस्त्यात आहे. भास्कर गाभूड असे त्या शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशांमध्ये कमिशन मागणाऱ्या शिक्षकांचं नाव आहे.
वडजी येथील जिल्हा परिषदेत शाळेत कार्यरत असणारे शिक्षक भास्कर गाभूळ यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय गणवेशात थेट सरपंचाच्या नावाखाली कमिशनची मागणी केली होती. या प्रकरणी मंगळवारी गावात चौकशी करण्यासाठी गेलेले पथकांनी थातूरमातूर चौकशी केल्याने त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोमवारी विद्यार्थ्यांच्या गणवेशातून भास्कर गाभूड या शिक्षकाचा कमिशन मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित गणवेश पुरवठा करणाऱ्या व्यक्तीसोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांनी पैठणच्या गटशिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार देऊन चौकशीची मागणी केली. या प्रकरणाची दखल घेत पैठणचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्रीराम केदार, शेख मुश्ताक, केंद्रप्रमुख मधुकर शेळके आदीचे पथक चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या संबंधित शाळेवर गेले. चौकशी पथक आल्याचे समजताच तक्रारदार ग्रामस्थांनी शाळेत धाव घेऊन जवाब नोंदवून पंचनामा करण्याची मागणी केली. मात्र पथकप्रमुख प्रभारी गटशिक्षणाधिकारी राम केदार यांनी काढता पाय घेण्यास सुरुवात करताच तक्रारदारांनी त्यांचेवर पैसे घेतल्याचा आरोप करत निघून जात असल्याचे सांगितले.
हेही वाचा: बेटिंग ॲप घोटाळ्यात राणा डग्गुबतीसह 29 कलाकार कायद्याच्या कचाट्यात
यानंतर केदार यांनी तक्रारदारास "तुम्ही मुर्ख आहात काय?" म्हणून संबोधले. यावेळी सर्वांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित पथकाला चांगलेच फैलावर घेतले. बराच वेळ संबंधित पथकाला निघून जाताना मज्जाव करत थांबण्यास भाग पाडले. मात्र संबंधित पथकाने केवळ थातूरमातूर चौकशी करुन त्या शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याच्या गणवेशात चक्क कमिशन मागण्यात आल्याची बाब उघड झाल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.
भविष्य घडविणारेच पवित्र ज्ञानमंदिरात विद्यार्थ्यांच्या गणवेशातून जर टक्केवारीची मागणी करत असतील तर भावी पिढीतील प्रामाणिकतेची अपेक्षा कशी ठेवणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष बाब म्हणजे त्या शिक्षकाची चौकशी करण्यासाठी आलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी देखील याप्रकरणी थातूरमातूर चौकशी करून ही कारवाई गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्यामुळे आता या कमिशन मागणाऱ्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई कधी होणार? हे पाहणं गरजेचं आहे. शिक्षण विभागाकडे एवढे ठोस पुरावे असतानाही त्या कमिशन मागणाऱ्या शिक्षकाला पाठीशी का घालत आहे असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत.